कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत BMC आयुक्तांचा गंभीर इशारा, म्हणाले...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

Updated: May 20, 2022, 11:30 AM IST
कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत BMC आयुक्तांचा गंभीर इशारा, म्हणाले... title=

मुंबई : कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. मुंबई अजूनही कोरोनाच्या प्रकरणांमध्ये चढ-उतार दिसून येतोय. अशा परिस्थितीत चौथ्या लाटेचा धोका भारतात कायम आहे. उत्तर कोरिया, युरोप आणि यूएस यांसारख्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणं वाढताना दिसतायत. तर काही तज्ज्ञांनी चौथ्या लाटेचा इशारा दिला आहे.

याचदरम्यान आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आयुक्त इक्बाल चहल यांनी म्हटलं की, मुंबईत जुलै ते सप्टेंबर दरम्यान चौथी कोविड-19 लाट येण्याची शक्यता आहे. मात्र ती पूर्वीच्या लाटांप्रमाणे तीव्र असणार नाही. त्यांच्या ‘इकबाल सिंग चहल-कोविड वॉरियर’या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्यांनी ही बाब ही गोष्ट सांगितली.

एका वेबसाईटशी बोलताना चहल म्हणाले, IIT कानपूरने जुलैमध्ये चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे जी सप्टेंबरमध्ये पीकवर येऊ शकते. युरोपमधील चौथी लाट पाहता, मला विश्वास आहे की, ही लाट खूप सौम्य असेल आणि सामान्य जीवनावर परिणाम करणार नाही. तसंच लॉकडाऊनसारख्या गोष्टी या मुंबईसाठी आता भूतकाळाच्या झाल्या आहेत.

जरी कोरोनाची चौथी लाट मुंबईमध्ये आली तरी ती दुसऱ्या लाटेसारखी धोकादायक ठरणार नाही. शिवाय यामुळे भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर दबाव येणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

ओमिक्रॉनच्या सबव्हेरिएंटचा भारतात शिरकाव

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या BA.4 सबव्हेरिएंटने भारतात शिरकाव केला आहे. देशात या व्हेरियंटचा पहिला रुग्ण सापडला आहे. हैदराबादमध्ये हा रुग्ण सापडला असून रुग्णावर उपचार सुरू आहेत.

शास्त्रज्ञांनी सांगितलं की, भारतातील BA.4 सब व्हेरिएंटची नोंद 9 मे रोजी GISAID वर करण्यात आली आहे. हा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या मोठ्या लाटेसाठी कारणीभूत ठरला आहे. हा संसर्ग आणि लसीकरणामुळे मिळालेल्या रोगप्रतिकारक क्षमतेलाही प्रभावित करण्यासाठी सक्षम आहे.