मुंबई : वातावरणामध्ये बदल झाला की लगेच आजारपण डोकं वर काढतात. अशातच रोगप्रतिकारक्षमता कमजोर असलेल्यांमध्ये व्हायरल फिव्हर जडण्याचं प्रमाण वाढतं. व्हायरल इंफेक्शनपासून दूर राहण्यासाठी अनेक अॅन्टीबायोटिक्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र त्याचा दुष्परिणाम आरोग्याला त्रासदायक ठरू शकतो. व्हायरल इंफेक्शनपासून बचावण्यासाठी प्रत्येक वेळेस औषधांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. काही घरगुती उपायांच्या मदतीनेदेखील व्हायरल इंफेक्शनचा सामना करता येऊ शकतो.
व्हायरल फिव्हरचा सामना करताना आल्यासोबत, हळद, काळामिरी आणि साखर मिसळून त्याचा काढा बनवा. दिवसातून तीन-चार वेळेस हा काढा प्यायल्यास ताप कमी होण्यास मदत होईल.
ग्लासभर पाण्यामध्ये चमचाभर धने टाकून पाणी उकळा. त्यानंतर पाणी गाळा. गरजेनुसार त्यामध्ये साखर/ गूळ किंवा मध मिसळून काढा बनव. चहाच्या स्वरूपात प्यायचा असल्यास त्यामध्ये दूध मिसळा. यामुळे व्हायरल फिव्हरचा सामना करण्यास मदत होते.
मूठभर तुळशीच्या पानांसोबत चमचाभर लवंगाची पावडर मिसळा. एक लीटर पाण्यामध्ये हे मिश्रण उकळा. काढ्याचा अर्क झाल्यानंतर दर 2 तासांनी गरजेनुसार प्यायल्यास त्याचा फायदा होतो.
रात्री चमचाभर मेथीचे दाणे भिजत ठेवा. सकाळी मेथीच्या दाण्यांमध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळा. या मिश्रणामुळे व्हायरल इंफेक्शनचा सामना करण्यास शरीर सक्षम होते.
एक भाग तांदूळ आणि निम्मा भाग पाणी मिसळून वाफवा. तांदूळ अर्धा शिजल्यानंतर पाणी काढा. या पाण्यामध्ये मीठ मिसळा. कांजी म्हणजेच पेजेचं पाणी असेही याला म्हणतात. व्हायरल इंफेक्शनचा सामना करण्यासाठी हे फायदेशीर आहे.
लसूण सोलून त्यामध्ये मध मिसळा. हे मिश्रण खाल्ल्याने इंफेक्शन कमी होण्यास मदत होते.
रात्रभर मनुका पाण्यात भिजत ठेवा. भिजलेल्या मनुका सकाळी खाल्ल्याने व्हायरल इंफेक्शनचा त्रास कमी होतो.