मुंबई : दिवसभर काम करून घरी आल्यावर टी. व्ही. बघणे यासारखा दुसरा विरंगुळा नाही.
दिवसभर आपण कॉम्प्युटर समोर असलो तरी टी. व्ही. बघितल्याने रिलॅक्स वाटते. कामाचा व्याप, इतर ताण यापासून मन मुक्त होते. म्हणून आपण जेवताना टी. व्ही. समोर बसतो. लहानपणापासून जेवताना टी. व्ही. बघू नये हे आपल्याला सांगितलेले असते. ते आरोग्यासाठी चांगले नाही, ही शिकवण आपल्याला मिळालेली असते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण आई-वडिलांच्या या शिकवणीत नक्कीच काहीतरी तथ्य असणार. म्हणून आम्ही मुंबईच्या Wockhardt Hospital चे Director, Bariatric आणि Metabolic Surgen, Dr Ramen Goel, यांच्याशी संवाद साधला. जाणून घेऊया त्यांनी सांगितलेली कारणे.
१. तुम्ही अधिक खाता: टी. व्ही. समोर बसून जेवताना तुम्ही नेहमीपेक्षा अधिक जेवता. कारण टी. व्ही. बघत जेवताना तुम्ही काय खाता व किती खाता याकडे तुमचे लक्ष नसते. तसंच तुमचे पोट भरले की नाही हे देखील तुम्हाला कळत नाही
२. कदाचित तुम्ही अधिक जंक फूड खाल: आपण सगळेच जाणतो, जंक फूड, पॅक फूड मध्ये अधिक कॅलरीज असून ते आरोग्यासाठी घातक असतात. तरी देखील टी. व्ही. समोर बसून चिप्स यासारखे पदार्थ आपण पटकन फस्त करतो. फ़्रेंड्स, फॅमिली सोबत टी. व्ही. बघताना तर आपण त्यात इतके गुंततो की आपण किती खातो याचे भान आपल्याला नसते. फास्ट फूड, पॅक फूडच्या जाहिराती टी. व्ही. वर सतत चालू असतात. त्यामुळे ते पदार्थ खाण्याचा मोह आपल्याला होतो आणि बऱ्याचदा आपण त्या मोहाला बळी पडतो. The International Journal of Communication and Health च्या अहवालानुसार जे लोक अधिक टी. व्ही. बघतात ते अधिक प्रमाणात जंक फूड खातात
३. स्थूलतेचा धोका वाढतो: अनेक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की टी. व्ही. बघत जेवल्याने स्थूलतेचा धोका वाढतो. विशेषतः लहान मुलांमध्ये हा धोका अधिक असतो. खूप वेळ टी. व्ही. समोर बसल्याने मेटॅबॉलिक रेट कमी होतो. तसंच कंबरेभोवती चरबी वाढू लागते आणि स्थूलतेचा धोका वाढतो. टी. व्ही. समोर बसून हळूहळू जेवण्यापेक्षा आधी शांतपणे जेवून घ्या आणि नंतर टी. व्ही. बघा. मुलांमध्ये स्थूलता येऊ नये म्हणून मुलांना देखील टी. व्ही. बघत जेवणाची सवय लावू नका.
४. तुमचे समाधान होणार नाही: जेव्हा तुम्ही टी. व्ही. बघत जेवता तेव्हा तुमचे मन जेवणात नसते. कारण तुमचे सर्व लक्ष टी. व्ही मध्ये असते. त्यामुळे जेवणातून मिळणारे समाधान तुम्हाला मिळत नाही. तुम्ही कितीही जेवलात तरी तृप्तीचा आनंद तुम्हाला मिळत नाही. टी. व्ही. बघत जेवणे यंत्रवत होते. कारण तुम्हाला तुमच्या जेवणाचा अंदाजच येत नाही. तसंच पोट भरल्याचे समाधान न मिळाल्यामुळे तुम्ही अधिक खाता.