ऐकावं ते नवलंच! कोरोना लस घेतल्यानंतर 'तो' पुन्हा बोलू लागला

कोरोनाची लस घेतल्यानंतर हा व्यक्ती पुन्हा बोलू लागल्याचा दावा करण्यात येतोय.

Updated: Jan 12, 2022, 11:28 AM IST
ऐकावं ते नवलंच! कोरोना लस घेतल्यानंतर 'तो' पुन्हा बोलू लागला title=

बोकारो : झारखंडमधील बोकारोमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीला कोरोनाची लस दिल्यानंतर तो अचानक बोलू लागला आहे. मुळात गेल्या 5 वर्षांपासून या व्यक्तीला बोलता येत नव्हतं. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतर हा व्यक्ती पुन्हा बोलू लागल्याचा दावा करण्यात येतोय.

5 वर्षांपूर्वी एका अपघातात आवाज गमावलेल्या आणि गेल्या एक वर्षापासून पूर्ण बेडरेस्टमध्ये असलेल्या एका व्यक्तीने जेव्हा कोरोनाची लस घेतली, तेव्हा त्याच्या शरीरात असं काही घडलं की ज्यामुळे सर्वांनाच थक्क केले. लस दिल्यानंतर ती व्यक्ती बोलू लागली आणि त्याचे शरीर पूर्णपणे जिवंत झाले.

55 वर्षीय दुलारचंद मुंडा यांच्या म्हणण्याप्रमाणे, 5 वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातानंतर त्यांचा आवाज गेला होता. त्यांना बोलता येत नव्हतं. पण जेव्हा त्यांनी कोरोनाच्या कोविशील्ड लसीचा डोस घेतला त्यानंतर त्यांचा आवाज पूर्णपणे ठीक झाला. आता ते बोलू शकत आहेत. 

दरम्यान या घटनेनंतर डॉक्टरही हैराण झाले आहेत. दुलारचंद मुंडा अपघातानंतर पाच वर्षे खडतर आयुष्य जगत होते. दुलारचंद पाच वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले होते. यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि  उपचाराअंती ते काहीसे बरे झाले. मात्र त्यांच्या शरीरातील  अवयव योग्यरित्या कार्यरत नव्हते. याशिवाय त्यांना बोलताही येत नव्हतं.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, दुलारचंद गेल्या काही वर्षांपासून अंथरूणाला खिळून होते. त्याच्या शरीराचे अनेक अवयव काम करत नव्हते आणि त्यांना नीट बोलताही येत नव्हते. दुलारचंद यांनी लस घेतल्यानंतर त्यांचा आवाज तर सुधारलाच, पण अपघातामुळे परिणाम झालेले अवयवही काम करू लागलेत. 

वैद्यकीय विभागाचे डॉ. अलबेल केरकेट्टा यांनी सांगितलं की, "दुलारचंद यांना 4 जानेवारी रोजी घरी कोरोनाची लस देण्यात आली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 5 जानेवारीला त्यांच्या शरीरात नव्याने हालचाली सुरु झाल्या. हे पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. आम्ही जुने रिपोर्ट्सही पाहिले असून त्यांचा मणक्याचा त्रास लसीने कसा बरा झाला, हा तपासाचा विषय आहे."