नवी दिल्ली : प्रदूषण हे देशासमोर एक मोठं आव्हानच निर्माण झालं आहे. भारतातील प्रदूषणाबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भारत प्रदूषणाच्या बाबतीत सर्वात वरच्या स्थानी असल्याचं एका जागतिक अहवालानुसार सांगण्यात आलं आहे. सध्याच्या आकडीवारीच्या आधारे, २०१७ मध्ये प्रदूषणामुळे भारतात २३.२६ लाख लोकांचा अकाली मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, प्रदूषणाच्या विविध पातळ्यांवर भारताची स्थिती सर्वात खराब असल्याचं समोर आलं आहे.
ब्रिटेनमधील हेल्थ मॅगझिन लॅन्सेटच्या अहवालानुसार, भारत प्रदूषणाच्या बाबतीत सर्वात वरच्या स्थानी आहे. एवढंच नाही तर, विषारी हवेमुळे भारतात २०१७ या एका वर्षात २३.२६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतानंतर प्रदूषण वाढवणाऱ्या टॉप १० देशांमध्ये चीन आणि अमेरिकेचा क्रमांक लागत असल्याचं ग्लोबल अलायन्स ऑन हेल्थ पॉप्युलेशनद्वारा करण्यात आलेल्या एका संशोधनात सांगण्यात आलं आहे.
भारतातील प्रदूषणाची स्थिती इतकी गंभीर आहे की, देशातील लोकसंख्येच्या प्रत्येकी एक लाख लोकांपैकी, १७४ लोकांच्या मृत्यूचं कारण विषारी हवा असल्याचं समोर आलं आहे. प्रदूषण केवळ बाहेरच नाही तर घरांमध्येही विषारी होत असल्याचं संशोधनातून सांगण्यात आलं आहे. अशा विषारी प्रदूषणामुळे संपूर्ण जगभरात आरोग्यासंबंधी आजार होण्याची शक्यता वाढली असल्याचं सांगण्यात आलं आहे.