साहेबरावांसोबत असा साजरा झाला 'बैल पोळा' हा सण

आज बैल पोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी शेतकऱ्याचा सच्चा साथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 21, 2017, 12:51 PM IST
साहेबरावांसोबत असा साजरा झाला 'बैल पोळा' हा सण title=

मुंबई : आज बैल पोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी शेतकऱ्याचा सच्चा साथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. 

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'. या मालिकेत एक पात्र म्हणून 'साहेबराब' या बैलाकडे पाहिलं जातं. राणा या बैलाशी संवाद साधतो. आणि या मालिकेतून शेतीचं आणि बैलाचं महत्व कायम सांगत आलेले आहेत. या मालिकेतून आजचा 'बैल पोळा' हा सण कसा साजरा झाला हे दाखवण्यात आलं आहे. पाहा त्याचा व्हिडिओ.

पूर्वापारपासून शेतकर्‍यांचा सच्चा साथी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण हर्षोल्लासात साजरा केला जातो. या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये यंदाही कमालीचा उत्साह दिसून येत आहे.  गावागावांत सोमवारी भरणार्‍या पोळ्यामध्ये आपलाच बैल उठून दिसावा, यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा साजशृंगार खरेदी करतात. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. 

 पोळ्याच्या दिवशी बैलांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा शुंगार), गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी), पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे आदी साहित्य खरेदी केले जाते. यानुषंगाने रविवारी वाशिम शहरासह जिल्ह्यातील मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, रिसोड आणि मालेगाव यासह ग्रामीण भागातील बाजारपेठेतही साहित्य खरेदीसाठी शेतकर्‍यांची तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले.