'मी सुंदर आहे का?' लोकप्रिय अभिनेत्रीला सतावतोय हा प्रश्न

सोशल मीडियावर वजनावर मिळणाऱ्या प्रतिक्रियांमुळे उदास वाटतं 

Updated: Jun 7, 2021, 12:19 PM IST
'मी सुंदर आहे का?' लोकप्रिय अभिनेत्रीला सतावतोय हा प्रश्न title=

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर हिने तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अन्विता फलटणकर एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. मालिकेचा एकंदरीतच असलेला विषय आणि स्वीटूची व्यक्तिरेखा ही बऱ्याच मुलींसाठी खूप रिलेटेबल आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वजनदारपणा बद्दल आपलं मत व्यक्त करताना स्वीटू म्हणजेच अन्विता म्हणाली, "मालिकेचा विषय साधारण त्याबद्दल असला तरीही सोशल मीडियावर वजनाबद्दल बोलणारे, विचारणारे आहेतच. कधीकधी खूप उदास वाटत असल्यावर या गोष्टींचा कुठेतरी फरक पडतो. पण मी आधीपासून अशीच आहे. त्यामुळे मी या परिस्थितीला हाताळायला शिकले आहे. आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे 'मी सुंदर आहे का?' हा प्रश्न मला पडलेला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पण माझ्या आयुष्यात काही माणसांनी मला खूपच सकारात्मकता दिली. मी सगळ्यांना हेच सांगेन की, तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमचं असणं महत्त्वाचं आहे. स्वीटू साकारताना थोडं दडपण होतं. मला अनेक मुलींच्या प्रतिक्रिया येतात तेव्हा खऱ्या आयुष्यातही स्वीटूसारख्या मुली आहेत याचा प्रत्यय येतो."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्वीटू आणि अन्विता मधील साम्य आणि फरक यावर बोलताना अन्विता म्हणाली, "जे आहे ते मान्य करायचं आणि पुढे जायचं आणि आपला आनंद आपणच छोट्या छोट्या गोष्टींतून शोधायचा हे विचार दोघींचे आहेत. त्या दोघीही गुबगुबीत आहेत; पण त्यांना त्यांच्या त्या 'असण्या'वर विश्वास आहे. दिसण्याच्या बाबतीत काही प्रश्न त्यांनाही पडलेत पण त्या त्यातून आत्मविश्वास कमवून त्या स्वतःला सांभाळायला शिकल्या आहेत. मी आणि ती आम्ही दोघी नृत्यांगना आहोत. पण स्वीटू खूप जास्त सहनशील आहे. मी तशी नाही."