Worli Hit And Run प्रकरणातील मृत महिला 'या' ज्येष्ठ अभिनेत्याची पुतणी; 'फाशीची शिक्षा द्या..' आक्रोश करत त्यांची मागणी

Worli Hit And Run Case : वरळी हिट अ‍ॅंड रन प्रकरणात पुतणीला गमावल्यानंतर मराठी जेष्ठ अभिनेत्यानं व्यक्त केला आक्रोश

दिक्षा पाटील | Updated: Jul 9, 2024, 09:21 AM IST
Worli Hit And Run प्रकरणातील मृत महिला 'या' ज्येष्ठ अभिनेत्याची पुतणी; 'फाशीची शिक्षा द्या..' आक्रोश करत त्यांची मागणी title=
(Photo Credit : Social Media/PTI)

Worli Hit And Run Case : रविवारी 7 जुलै रोजी वरळीमध्ये घडलेल्या हिट अ‍ॅंड रन प्रकरणानंतर संपूर्ण मुंबई जणू हादरली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर आता लगेच मुंबईत घडलेल्या या प्रकरणामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. या अपघातात 45 वर्षीय कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती प्रदीप नाखवा वय 50 वर्ष हे गंभीर जखमी आहेत. रविवारी सकाळी 5.30 च्या सुमारास वरळीतील अ‍ॅट्रिया मॉलजवळ त्यांना BMW कारनं धडक दिली. यावेळी ते दोघं ससून डॉकवरून मासे विकत घेऊन घरी परतत असताना त्यांना बीएमडब्ल्यू कारनं धडक दिली. तर या घटनेत आरोपी हा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीरचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत असताना ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांनी देखील नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

मृत कावेरी नाखवा या ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांच्या पुतणी लागत होत्या. त्या घटनेबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना 'मागणी केली की आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी.' जयवंत वाडकर म्हणाले, 'अशा आरोपींसाठी कठोर कायदा काढायला हवा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यायला हवी. ज्या विकृत पद्धतीनं गाडी चालवून एखाद्याचा जीव घेणं हे काय आहे ना हे त्या माणसालासुद्धा जाणीव पाहिजे. आपल्या गाडीसमोर उंदीर आला तरी आपण थांबतो. आपण त्या प्राण्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. इथे तुमच्या गाडीसमोर एखादी व्यक्ती येते आणि तुम्ही तिला फरफटत घेऊन जाता ही गोष्ट किती वाईट आहे. इतकंच नाही तर त्यानंतर गाडी तशीच तिथे सोडून पळून जाणं हे जास्त वेदनादायी आहे.' 

शासनाकडे केली विनंती

पुढे शासनाला विनंती करत जयवंत वाडकर म्हणाले, 'कृपया या आरोपीवर दया दाखवू नका. कारण, तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत. तो रात्री बारमध्ये दारू प्यायला, अठरा हजारांचं बिल झालं. त्यावेळी तिथे मर्सिडीज गाडी होती, मग ही बीएमडब्ल्यू गाडी कुठुन आली? तर त्याची मैत्रीण कोण आहे. तर या प्रकरणी शासनानं एकालाही सोडू नये. माझा पोलिसांवर विश्वास आहे आणि ते योग्य ते कारवाई करतील याची खात्री आहे. त्यामुळे अशा लोकांना सोडू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण एका पाठोपाठ एक अशा या घटना घडल्या आहेत.' 

हेही वाचा : उषा उत्थुप यांच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, फार खास आहे त्यांची लव्ह स्टोरी

पुतणीच्या आठवणीत भावूक झाले जयवंत वाडकर

जयवंत वाडकर त्यांच्या पुतणी विषयी पुढे म्हणाले, 'ती माझी सख्खी पुतणी होती आणि आता त्याबद्दल काय बोलू हे मलाच काही कळत नाही. त्या पोरीची आता मला गणपतीत एवढी आठवण येणार आहे ना... दादरवरून फुलं आणणं, गणपतीची कंठी बनवणं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आता आठवणीत राहतील. बऱ्याचवेळा आरती झाल्यावर मी तिला वरळीच्या घरी सोडलं आहे आणि मग पुढे बिंबिसार नगरला माझ्या घरी जायचो. त्यामुळे अशात ती सतत आठवेल. तिनं खूप कष्ट करत सगळं मिळवलं होतं. तिची खूप आठवण येईल.'