मुंबई : सेलिब्रिटी जोड्या म्हणजे चाहत्यांच्या चर्चेचा आवडता आणि तितकाच महत्त्वाचा विषय. कोणत्या सेलिब्रिटी जोडीच्या आयुष्यात सध्या काय सुरु आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये कायमच कुतूहल पाहायला मिळतं. अशा या सेलिब्रिटी जोड्या म्हणजे 'दीपवीर', 'विरुष्का', 'निक्यांका'.... अशा या जोड्यांमध्ये मराठी विश्वातीलही एक जोडी आहे बरं. ती जोडी म्हणजे 'संत्या' आणि 'सुरकी'ची, 'संतुर्की'.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली सुप्रसिद्ध मराठी वेबसीरीज "गावाकडच्या गोष्टी" आता एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. या वेबसीरिजच्या दोन पर्वांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला असता तरीही हा एक अल्पविराम आहे हेच या नव्या वळणावरुन स्पष्ट होत आहे. कारण, 'कोरी पाटी प्रोडक्शन'च्या 'गावाकडच्या गोष्टी'मधील लोकप्रिय जोडी 'संत्या-सुरकी' यांची प्रेमकथा आता 'संतुर्की' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नितीन पवार दिग्दर्शित या वेबचित्रपटातून पाहता येणार आहे. मराठी मनोरंजन जगातील हा पहिलावहिला प्रयोग असल्यामुळे त्याला आता प्रेक्षकांचा नेमका कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. साधी आणि सर्वांना आपलीच वाटावी अशी कहाणी असलेल्या 'गावाकडच्या गोष्टी' या वेबसीरिजच्या दोन्बही पर्वांना बरीच लोकप्रियता मिळाली.
सातारा जिल्ह्यातील केळेवाडी गावात जन्मलेल्या या वेबसीरिजला जगभरातून प्रेम मिळालं. त्यातील 'संत्या' आणि 'सुरकी' ही पात्र तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. एकमेकांवर जिवापाड प्रेम असूनही वाटेत येणाऱ्या अडचणी, 'सुरकी'चं दूर जाणं आणि त्यानंतर पुन्हा 'संत्या'च्या समोर येणं या साऱ्यात विरह, तगमग आणि बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं 'संतुर्की'मधून मिळणार आहेत. या वेब चित्रपटाच्या निमित्ताने संतोष राजेमहाडीक, रश्मी साळवी हे मुख्य भूमिकेत दिसणार असून के.टी.पवार, तृप्ती शेडगे, शुभम काळोलिकर,समाधान पिंपळें हे कलाकार देखील यात झळकणार आहेत.