मुंबई : बॉलिवुड अभिनेत्री विद्या बालनला बॉडी शेमिंगबाबत शिकार व्हावं लागल्याची घटना समोर आली. परंतु विद्याने अतिशय खंबीरपणे याचा सामना केला. आता विद्याचा बॉडी शेमिंगवरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओचं नाव 'लेट्स टॉक अबाउट बॉडी शेमिंग' असं आहे. व्हिडिओमध्ये विद्या बालन बॉडी शेंमिंगबाबत बोलत असताना अचानक भावूक होऊन रडताना दिसतेय.
व्हिडिओमध्ये विद्याच्या अनेक बॉलिवूड गाण्यांमधून बॉडी शेमिंगवर मेसेज देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. व्हिडिओच्या शेवटी विद्याने 'कधी शरीराच्या आकारावर, कधी डोळ्यांच्या आकारावर, कधी रंगावर तर कधी कोणत्याही अवयवावर विनोद करुन चिडवणं चुकीचं आहे. तुम्हाला अंदाजही नाही की, असं केल्याने एखाद्याचा आत्मविश्वास किती ढासळू शकतो.' असं म्हटलं आहे.
'कोणालाही तुमचे हे विनोद बोचू शकतात. कोणत्याही रंग, रुप, आकार आणि वजनाचा विनोद करु नका. शेवटी प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती खास आहे' असं म्हणत तिने तिचं मत व्यक्त केलं आहे.
विद्या बॉडी शेमिंगवर बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. 'मी जेव्हा तरुण होती लोक मला तुझा चेहरा किती सुंदर आहे, तू तुझं वजन कमी का करत नाही? असा प्रश्न केला जायचा. परंतु असा प्रश्न कोणालाही विचारु नये. तो मोठा किंवा लहान कोणीही असू दे.' असं विद्याने म्हटलंय.
विद्या बालनने 'तुम्हारी सुलू' चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता पुन्हा एकदा विद्या अक्षय कुमारसह 'मिशन मंगल' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.