पुणे : आपल्या भूमिकांच्या बळावर 'सैराट', 'ख्वाडा', 'फँड्री' इतकंच नव्हे, तर 'सेक्रेड गेम्स' या सीरिजच्या माध्यमातून वेगळी ओळख साकारणाऱ्या ज्येष्ठ कलावंत रामचंद्र धुमाळ यांचं निधन झालं. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ आजाराने त्यांचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे.
फक्त चित्रपटांमध्येच नव्हे, तर वेब सीरिजच्या माध्यमातूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नेटफ्लिक्सवरुन प्रदर्शित झालेल्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या 'सेक्रेड गेम्स', या वेब सीरिजमध्ये त्यांनी नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणजेच ऑनस्क्रीन 'गणेश गायतोंडे'च्या वडिलांची भूमिका साकारली होती.
मराठी आणि हिंदी चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. उतारवयात मिळालेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देणारा अभिनेता म्हणूनही त्यांची वेगळी ओळख या कलाविश्वात प्रस्थापित झाली होती.
धुमाळ यांच्या जाण्याने त्यांत्यासह स्क्रीन शेअर करणाऱ्या कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे. लहान भूमिकांनाही वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा एक अभिनेता म्हणून धुमाळ यांची ओळख आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहणार आहेत.