मुंबई : काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती चिंताजनक असून, रविवारपासून त्यांच्या निधनाच्या अफवा उठण्यास सुरुवात झाली होती. पण, अखेर खान यांचा मुलगा सरफराज याने या वृत्ताला झुगारुन लावत अफवांना पूर्णविराम दिला.
'हे सारंकाही खोटं आहे. या अफवा आहेत. माझे वडील सध्या रुग्णालयात आहेत', असं तो पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हणाला.
८१ वर्षांच्या कादर खान यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास उदभवल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी व्हेंटिंलेटरवर ठेवल्याचं कळत आहे. कादर खान Progressive Supranuclear Palsy या व्याधीपासून त्रस्त आहेत. ज्यामुळे त्यांचा वारंवार तोल जात असून, चालण्यातही अडथळा येत असल्याचं सांगितलं जात आहे.
खान यांच्या प्रकृती अस्वास्थ्याविषयी माहिती मिळताच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचताच अनेकांनीच चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही ट्विट करत त्यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली.
काबूल येथे जन्मलेल्या कादर खान यांनी १९७३ मध्ये राजेश खन्ना यांच्या 'दाग' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. जवळपास ३०० चित्रपटांतून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. २५० हून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी संवादलेखनाची जबाबदारीही पार पा़डली. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी रणधीर कपूर आणि जया बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या 'जवानी दिवानी' या चित्रपटासाठी संवाद लेखन केलं होतं.
पटकथालेखनाच्या निमित्ताने त्यांनी अनेकदा मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासोबत काम केल्याचं पाहायला मिळालं. देसाई यांच्यासोबत 'धरम वीर', 'गंगा जमुना सरस्वती', 'कूली', 'देश प्रेमी', 'सुहाग', 'परवरिश', 'अमर अकबर अँथनी' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. तर मेहरा यांच्यासोबत 'ज्वालामुखी', 'शराबी', 'लावारिस' आणि 'मुकद्दर का सिकंदर' हे त्यांचे गाजलेले चित्रपट.