मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारणारे, काळ कितीही पुढे गेला, वय कितीही वाढलं तरीही ते वयोवृद्ध न होणारे अशीच रमेश देव यांची ओळख. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. रमेश देव यांच्या जाण्यानं सानथोर प्रत्येकजण हळहळला. कारण, हा चेहरा प्रत्येकालाच आपलासा वाटत होता. (Ramesh Deo)
रमेश देव, म्हणजे त्या काळचे चॉकलेट हिरो; असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
सडपातळ देहबोली, रुबाब तर इतरांनाही लाजवणारा आणि चेहऱ्यावर असणारं ते सौंदर्य.... देवांची वर्णनं करावी तरी कशी आणि किती?
कोणासाठी ते चित्रपटसृष्टीतले देव, कोणासाठी हरहुन्नरी देव, तर कोणासाठी चिरतरुण देव. अशा या अभिनेत्याची ही ओळख, अर्थात त्यांचं आडनाव नेमकं कुठून आलं, ठाऊक आहे?
यामागे आहे एक रंजक आठवण. देव कोल्हापूरचे असले तरीह त्यांच्या कुटुंबाची पाळंमुळं राजस्थानातील जोधपूरशी जोडलेली.
असं म्हटलं जातं की रमेश देव यांचे वडील राजर्षी शाहू महारज यांच्या दरबारात फौजदारी वकील पदावर सेवेत होते.
आश्चर्य वाटेल, पण देवांच्या आजोबा आणि पणजोबांनी थेट जोधपूर पॅलेस पासून अगदी कोल्हापूर शहर वसवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं होतं.
पू्र्वज जोधपुरात स्थायिक होते. पण, रमेश देव यांचे आजोबा अभियांत्रिकी क्षेत्रात सक्रिय. ज्यांना खुद्द शाहू महाराजांनी कोल्हापूर वसवण्यासाठी दरबारी बोलवलं.
आजोबा इंजिनियर आणि वडील, फौजदारी वकील; अशी शाहू आणि त्यांची गाठ पडली.
आता मुद्दा 'देव' आडनावाचा. तर, रमेश देव यांचं याआधीचं आडनाव होतं ठाकूर. राजर्षींनी दिलेल्या शिष्यवृत्तीवर त्यांचे वडील वकिल झाले होते.
एका कामात त्यांनी शाहू महाराजांची मोठी मदत केली होती, तेव्हा त्यांच्या तोंडून उद्गार निघाले 'ठाकूर, तुम्ही देवासारखे भेटलात हो; आतापासून तुम्ही देवच'.
रमेश देव हे स्वामिनिष्ठ होते. त्यांनी कधीच महाराजांची आज्ञा डावलली नव्हती. सवयीप्रमाणं हा शब्दही खाली पडला नाही आणि तेव्हापासूनच ठाकूर कुटुंबाची ओळख झाली, 'देव'.