दिलीप कुमार यांना धमक्या, मदतीसाठी सायरा बानू यांची पंतप्रधानांकडे धाव

मुख्यमंत्र्य़ांकडून आश्वासन मिळूनही...

Updated: Dec 17, 2018, 07:22 AM IST
दिलीप कुमार यांना धमक्या, मदतीसाठी सायरा बानू यांची पंतप्रधानांकडे धाव title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सारा बानू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. त्यांच्या बंगल्याच्या भूखंडावर मालकी हक्क सांगणाऱ्या बिल्डर समीर भोजवानी याची पोलीस कोठडीतून सुटका झाल्याची बाब निदर्शनास आणत त्यांनी हे ट्विट केलं. 

मुंबईतील वांद्रे परिसरात असणाऱ्या पाली हिल येथे हा बंगला असून, त्याचा वाद आता सर्वांचं लक्ष वेधत आहे. त्याचविषयी ट्विट करत रविवारी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन बानू यांनी ट्विट करत संबंधित प्रकरणाची माहिती देत पंतप्रधानांकडून मदत मागितल्याचं पाहायला मिळालं. 

'मी सायरा बानू माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करते. जमीन माफिया समीर भोजवानी याची कारागृहातून सुटका झाली आहे. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आश्वासन देण्यात येऊनही कोणतीच कारवाई मात्र करण्यात आली नाही. एका पद्मविभूषीत व्यक्तीला पैसे आणि बळाचा वापर करत धमकावण्यात येत आहे. या प्रकरणीच मला मुंबईत आपली भेट घ्यायची आहे...', असं त्यांन ट्विटमध्ये लिहिलं. मोदी मंगळवारी मुंबईत येणार असून, आता ते आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत बानू यांचं गाऱ्हाणं ऐकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

भोजवानी याच्याविषयी आता मोदी कलाविश्वातील या दिग्गज जोडप्याच्या मदतीला धावणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, याआधीही बानू यांनी पोलिसांची मदत घेत भोजवानीविरोधात तक्रार दाखल केली होती. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात ईओडब्ल्यूकडून भोजवानीविरोधात बंगल्याचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हणत खटला दाखल करण्यात आला होता. 

भोजवानीने संबंधित भूखंडाची खोटी कागदपत्र तयार केल्याचा संशय पोलिसांना होता. ज्यानंतर ईओडब्ल्यूच्या एका चमूने भोजवानी यांच्या घरी छापा मारला होता. त्यावेळी त्यांच्या घरातून काही शस्त्रही जप्त करण्यात आली होती. ज्यानंतर एप्रिल महिन्यात त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं.