मुंबई : दोन दिवसांवर वटपौर्णिमा हा सण आहे. पावसाळ्यातील हा पहिला जण असून या दिवशी विवाहित सौभाग्यवती महिला आपल्या नवऱ्याच्या दिर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. सणाचे वेध हे मराठी मालिकांना देखील लागतात. झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्याला आता वटपौर्णिमा हा सण साजरा होताना पाहायला मिळणार आहे. झी मराठीवरील सगळ्या लोकप्रिय जोड्या वटपौर्णिमेचा सण साजरा करताना दिसणार आहेत. पण या वाहिनीवरील एक लोकप्रिय आणि नवविवाहित जोडी आहे. ज्यांचा हा पहिला वटपौर्णिमेचा सण असणार आहे. आणि ही जोडी म्हणजे लागीरं झालं जी मधले शितली आणि अज्या.
झी मराठीवर आपल्याला प्रत्येक नायिका आपल्या नवऱ्यासाठी वडाची पूजा करताना दिसणार आहे. गुरू कितीही शनायाच्या मागे गेला तरी राधिका आपले तत्व काही सोडणार नाही. किती अबोला असला तरीही राधिका गुरूनाथसाठी वटपौर्णिमेचा उपवास करणार आहे. तसेच शितली आणि अज्या ही नवी जोडी आहे. यांचा लग्नानंतरचा हा पहिला सण आहे. तसेच गेल्यावर्षी शितली अज्यासी वटपौर्णिमेच्या दिवशी देखील भांडली होती. पण आताचा हा सण त्यांच्यासाठी खास आहे. वटपौर्णिमेच्या या सणानंतर फौजी अज्या आपल्या ड्युटीवर जाणार आहे.
त्याचप्रमाणे पाठक बाई देखील राणाकरता हा उपवास करणार आहेत. आरोग्य आणि शिक्षणाचा वसा घेतलेल्या या जोडीने ही पूजा केली आहे. तसेच जागो मोहन प्यारे म्हणणाऱ्या या दोघांनी देखील आपला वटपौर्णिमेचा सण साजरा केला आहे.
पाठक बाई शितलीला विचारतात तुझी पूजा लवकर झाली. तर शितली म्हणते हो... मी ज्या झाडाला पूजा करायला गेले तेथे गर्दीच नव्हते. अशावेळी पाठक बाईंना आश्चर्यच वाटतं असं कसं? तेव्हा कळतं की शितलीने वडाची नाही तर पिंपळाच्या झाडाची पूजा केली आहे.