केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बॉलिवूडमध्ये अपयश आल्यानंतर राजकारणाकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आपला आता पुन्हा चित्रपटांकडे वळण्याचा कोणताही विचार नसून, आपण फार वाईट अभिनेते असल्याचं ते उपहासात्मकपणे म्हणाले आहेत. आपण इतके वाईट अभिनेते आहोत की, आपली लोकसभेतील सहकारी आणि पहिली अभिनेत्री कंगना रणौतही पुन्हा स्क्रीन स्पेस शेअर करणार नाही असंही ते म्हणाले आहेत. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी 2011 मध्ये 'मिले ना मिले हम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्यांच्यासोबत कंगना मुख्य भूमिकेत होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल आपटला होता.
तसंच आपली अजून दोन वर्षं तरी लग्न करण्याची कोणतीही योजना नसून आपल्या पूर्णपणे राजकारणाला समर्पित व्हायचं आहे असंही ते म्हणाले आहेत. खासकरुन पुढील वर्षी होणाऱ्या बिहार निवडणुकीकडे लक्ष द्यायचं असल्याचं ते म्हणाले आहेत. "मला वाटतं लग्न ही फार मोठी जबाबदारी आहे. तुम्ही पूर्णपणे कामात गुंतून राहू शकत नाही आणि आपल्या जोडीदाराला आपलं काम ही प्राथमिकता आहे असं सागू शकत नाही. जर कामच तुमची प्राथमिकता आहे तर मग तुमच्या इतर प्राथमिकता नंतर ठरवा," असा सल्ला त्यांनी दिला आहे.
"मी माझ्या प्राथमिकतेबद्दल फार स्पष्ट आहे. मी माझ्या कामाशीच लग्न केलं आहे. जर मला माझ्या जोडीदाराला वेळच द्यायला जमणार नसेल तर मी त्यात पडू नये," असं स्पष्ट मत चिराग पासवान यांनी मांडलं आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या कंगना रणौतने राजकारणात प्रवेश केला आणि हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणूक जिंकली. यानंतर पासवान यांचा पहिला चित्रपट पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आला आणि अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्यांना पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला आवडेल असं सांगितलं. पण चिराग पासवान यांनी कमबॅक करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
चित्रपटसृष्टीत परतण्याचा विचार कधी करणार का असं विचारले असता पासवान म्हणाले की, "पुन्हा? इतक्या खराबक कामगिरीनंतर!" "नाही, अजिबात नाही. मला वाटतं की ज्यांनी चित्रपट पाहिला आहे ते माझ्याशी सहमत असतील". बॉलिवूडमधील छोट्याशा कारकिर्दीने आयुष्यात काय करू नये हे शिकवलं आहे असंही त्यांनी हसत हसत सांगितलं.
दरम्यान मुंबईत राहत असताना आपल्याला बिहारच्या लोकांना काय आणि किती संघर्ष करावा लागतो याची जाणीव करुन देत त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली असंही त्यांनी सांगितलं. अभिनेता म्हणून आपण कारकीर्द सुरु केली असली तरी ही आपली जागा नसल्याचं जाणवलं असंही ते म्हणाले.
राजकारण ही सहजपणे घेण्याची गोष्ट नाही, असंही त्यांनी सांगितलं. "मला वाटतं राजकारण ही एक मोठी जबाबदारी घेऊन येते आणि तुम्ही हे कर्तव्य सहजासहजी घेऊ शकत नाही. तसेच एक खासदार या नात्याने मी माझ्या मतदारसंघातील 25 लाख लोकांसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून माझ्यावर देशभरासाठी जबाबदारी आहे. मी हे फार सहजपणे घेऊ शकत नाही. आणि हो, कंगनासह कोणताही दिग्दर्शक, निर्माता माझ्यासोबत चित्रपट करण्यास सहमत होणार नाही," असं ते म्हणाले.
कंगनासोबत चित्रपट करणार का असं विचारले असता पासवान म्हणाले, "ती करणार नाही. मी किती चांगला अभिनेता आहे हे तिला माहिती आहे. मी खूप वाईट अभिनेता आहे. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहण्याची गरज आहे".