मुव्ही रिव्ह्यू : तुला कळणार नाही !

दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी या ‘तुला कळणार नाही’ हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आल्या आहेत. त्यांचे याआधी ‘मितवा’ आणि ‘फुगे’ हे सिनेमे आले होते.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Sep 8, 2017, 12:31 PM IST
मुव्ही रिव्ह्यू : तुला कळणार नाही ! title=

अमित इंगोले, झी २४ तास, मुंबई : दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी या ‘तुला कळणार नाही’ हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आल्या आहेत. त्यांचे याआधी ‘मितवा’ आणि ‘फुगे’ हे सिनेमे आले होते.

यातील ‘मितवा’ला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे असूनही ‘फुगे’तील फुगे असे काही फुटले की, विचारता सोय नाही. आता ‘तुला कळणार नाही’ हा सिनेमा सुद्धा फार काही वेगळा नाही. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांच्यासारखे कलाकार असल्याने सिनेमा बरा असेल असा अंदाज होता. मात्र तो फोल ठरला. 

नवरा-बायकोतील बारीक-सारीक गोष्टींवरून होणारं भांडण, त्यातून उडणारे खटके, रागाच्या भरात टोकाची भूमिका घेणं हे काही नवीन कथानक नाहीये. फक्त त्यांचा प्लॉट वेगवेगळा असतो. हा वेगळा प्लॉट जमला तरच सिनेमाही वेगळा आणि मनोरंजक होतो, हे काही वेगळं सांगायला नको. इथे मात्र सगळा गोंधळ उडाला आहे. 

कथानक -

ही कथा आहे राहुल आणि अंजलीची...त्यांचं लग्न होऊन काहीच वर्ष झालीयेत...दोघांनी प्रेमविवाह केलाय...त्यामुळे लग्नाआधीचं आणि लग्नानंतरचं त्यांचं जगणं अर्थातच वेगळं आहे. त्यांच्यात आता खूप भांडणं होऊ लागली आहेत. अशात दोघेही रागाच्या भरात घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. सिनेमा म्हटल्यावर हिरो-हिरोईन एक होणार हे नक्कीच..पण ते कसे सगळं विसरून एकत्र येतात, त्यांना एकत्र येण्यासाठी कोणत्या गोष्टी भाग पाडतात, ते कसे एकत्र येतात, असा हा प्रवास आहे. 

काय वाटलं?

कथा फारच सोपी आणि सरळ आहे. पण ती पुढे नेण्यासाठी जे काही उभं केलं गेलंय. त्यात सगळा गोंधळ झाला आहे. सिनेमाची स्क्रिप्ट इतकी काही विस्कटलेली आहे की, सिनेमा कुठून सुरू झाला आणि कुठे पोहोचला हेच कळत नाही. अनेक विनोदी सीन्स इतके फ्लॅट आहेत की, पार घासूनपुसून गुळगुळीत झालेले विनोद ऎकून हसूही येत नाही. दोघांमधील भांडण फारच नाटकी वाटतं. त्यासोबतच इंटरव्हलनंतर येणारे सब प्लॉटने तर सिनेमा अधिकच रटाळ केलाय. ‘तूला कळणार नाही’ हे टायटल सॉंग चांगलं झालंय. कथा चांगली होती, पण ती मांडण्यात गोंधळ झाल्याचं स्पष्ट दिसतं. 

अभिनय -

सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी दोघेही लोकप्रिय कलाकार यात नवरा-बायको दाखवले आहेत. दोघांनीही त्यांच्या पद्धतीने त्यांना सोपवलेली जबाबदारी पार पाडली आहे. मात्र दिग्दर्शिकेने त्यांची पात्र फारच भडक केल्याचं जाणवत राहतं. सुशांत शेलार याचं पात्र फारच भडक आणि बोरिंग झालं आहे. सुबोध आणि सोनाली यांच्यातील काही इमोशन सीन्स छान झालेत. 

एकंदर काय?

या सिनेमातील कथानकात वेगळं काहीच नाही. जरी संपूर्ण सिनेमाभर प्रवास दाखवला गेला असला तरी त्याला रोड मुव्ही म्हणावा का? असा प्रश्न पडतो. दोन मोठे कलाकार असूनही सिनेमात वेगळेपण काहीच वाटत नाही. जसजसा सिनेमा पुढे जातो तसतसा तो रटाळ होत जातो. आता तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं ते...!

रेटींग - २ स्टार