वडापाव विक, म्हणणाऱ्यांना ‘या’ अभिनेत्याचं झणझणीत उत्तर

तो चाहत्यांशी संवाद साधत असतो आणि हो, ट्रोलर्सना सडेतोड उत्तरही देत असतो. 

Updated: Sep 26, 2018, 07:55 PM IST
वडापाव विक, म्हणणाऱ्यांना ‘या’ अभिनेत्याचं झणझणीत उत्तर  title=

मुंबई: सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या कलाकारांची नावं घेण्यास सांगितलं असता अनेकांच्या तोंडी पहिलं नाव येतं ते म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन याचं. अभिषेक नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आगामी चित्रपटांविषयी माहिती देत असतो, चाहत्यांशी संवाद साधत असतो आणि हो, ट्रोलर्सना सडेतोड उत्तरही देत असतो. सध्याही ट्विटरवर त्याचं हेच रुप पाहायला मिळालं आहे.

काही दिवसांपूर्वीच तो ‘मनमर्जियाँ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. बऱ्याच दिवसांनंतरच्या त्याच्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी पसंती दिली नाही.

अभिषेकच्या वाट्याला सातत्याने आलेल्या या अपयशामुळे नेटकऱ्यांनी त्याला लगेचच निशाण्यावर घेतलं. काही युजर्सनी तर त्याला अभिनय सोडून वडापाव विकण्याचा फुकाचा सल्लाही दिला.

चांगल्या चित्रपटालाही अपयशी करण्याची पात्रता अभिषेककडे आहे, असं उपरोधिक ट्विट करत त्याने वडापावची गाडी सुरु करावी असं त्या युजरने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं.

डॉ. हर्षवर्धन काळे या युजरच्या ट्विटला ज्युनिअर बच्चनने आपल्या शैलीत उत्तर देत इतर टीकाकारांनाही थेट शब्दांत सुनावलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

‘मी तुमचा आदर करतो. पण, तुमच्यासारख्या डॉक्टरांनी निदान काही वक्तव्य करण्यापूर्वी सर्व गोष्टी (चित्रपटाच्या कमाईचे आकडे) नीट तपासून पहाव्यात. चित्रपटाच्या व्यवसायाविषयी थोडी माहिती करुन घ्या जेणेकरुन पुढच्या वेळी तुम्ही तोंडघशी पडणार नाही, असं त्याने लिहिलं.  

अभिषेकचं हे ट्विट पाहता त्याच्या अपयशाची खिल्ली उडवणाऱ्यांनाही उत्तर मिळालंच आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.