2500 ची तिकीटंही Sold Out, रात्री 3 AM चे शो अन्...; प्रदर्शनापूर्वीच 'या' चित्रपटाची तुफान क्रेझ

This Movie Tickets Costing 2500 Rupees Sold Out: हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच 21 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद हा अविश्वसनिय असाच असल्याचं आकडेवारीवरुन पाहायला मिळत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 19, 2023, 12:09 PM IST
2500 ची तिकीटंही Sold Out, रात्री 3 AM चे शो अन्...; प्रदर्शनापूर्वीच 'या' चित्रपटाची तुफान क्रेझ title=
रात्री 3 वाजताचे शो सुद्धा लावण्यात आले आहेत

This Movie Tickets Costing 2500 Rupees Sold Out: जगातील सर्वात भन्नाट आणि प्रतिभावान दिग्दर्शकांमध्ये ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. बॅटमॅनला मोठ्या पडद्यावर पुन्हा गतवैभव मिळून देणाऱ्या या दिग्दर्शकाचा जवळजवळ प्रत्येक चित्रपट गाजला. ख्रिस्तोफर नोलन यांनी दिग्दर्शित केलेल्या शेवटच्या 3 चित्रपटांची नावं आहेत इंटरस्टेलर, डनकर्क आणि टेनेट. चित्रपटांच्या मांडणीबरोबरच प्रेक्षकांच्या बृद्धीला चालना देणारे आणि विचार करण्यास भाग पाडणाऱ्या या दिग्दर्शकाच्या नजरेतून साकारलेला नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट म्हणजे 'ओपनहायमर' (Oppenheimer)

दिग्दर्शकाचं नावच पुरेसं आहे

चित्रपट क्षेत्रातील दिग्गज असो किंवा नवखे चाहते असो सर्वांनाच ज्या मोजक्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांची प्रतिक्षा असते त्यामध्ये ख्रिस्तोफर नोलन यांचं नाव घेतलं जातं. ख्रिस्तोफर नोलन यांच्या 'ओपनहायमर' या चित्रपटाचा विषयही फारच रंजक आणि तितकाच स्फोटक आहे. 'ओपनहायमर' चित्रपटाची जगभरात चर्चा आहे. मात्र या चित्रपटासाठी भारतात असलेली क्रेझ पाहूनच तुम्हाला ख्रिस्तोफर नोलन यांच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येईल. 'ओपनहायमर' हा चित्रपट म्हणजे 'फारद ऑफ आयटम बॉम्ब' नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्युलिअस रॉबर्ट ओपनहायमर यांचा चरित्रपट आहे. ओपनहायमर हे जगातील पहिलं अण्वस्त्र तयार करणाऱ्या मॅनहॅटन प्रोजेक्टचे निर्देशक होते. याच प्रकल्पामध्ये निर्माण करण्यात आलेला अणूबॉम्ब अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानच्या भूमीवर टाकले होते. या बॉम्बस्फोटांमध्ये 2 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. याच सर्व घटनाक्रमाची कथा 'ओपनहायमर'मध्ये मांडण्यात आली आहे. हा चित्रपट पाहण्याची भारतामध्येही चित्रपट चाहत्यांची गर्दी होत आहे. 

90 हजार तिकीटं प्रदर्शनाआधीच विकली गेली

'ओपनहायमर' हा चित्रपट 21 जुलै रोजी भारतामध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या अगाऊ बुकिंग (Oppenheimer Advance Booking) इतकी आहे की देशातील 3 मोठ्या महानगरांमधील 90 हजार तिकीटं (Oppenheimer Ticket) बुक झाली आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी हा आकडा 1 लाख 20 हजारांपर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊननंतर प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांच्या अगाऊ बुकिंगला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. यामध्ये अगदी अक्षय कुमार, ऋतिक रोशन, रणबीर कपूर, सलमान खान यासारख्या अभिनेत्यांच्या चित्रपटांकडेही चाहत्यांनी पाठ फिरवल्याचं पहायला मिळालेलं असतानाच दुसरीकडे हे असं चित्र दिसत आहे. 

रात्री 3 चे शो

ख्रिस्तोफर नोलन हे केवळ कथा सांगत नाही तर चाहत्यांना त्या कथेबद्दल विचार करायला भाग पाडतात. म्हणूनच त्यांचे चित्रपट थेअटरमध्ये जाऊन पाहण्यास लोक प्राधान्य देतात. त्यामुळेच आयमॅक्स फॉरमॅटचे बुकींगही जवळजवळ फुल झाले आहेत. मोठे चित्रपट प्रदर्शित होतात तेव्हा अतिरिक्त शो लावले जातात. असेच विशेष शो ठाण्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. या चित्रपटाला इतकी मागणी आहे की 20 जून रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी हा शो चालवला जाणार आहे. म्हणजेच तांत्रिक दृष्ट्या चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधीच हा चित्रपट दाखवला जाणार आहे. मुंबईतील अनेक थेअटरमध्ये रात्री 3 चे शोही लावण्यात आले आहेत. मात्र या शोची तिकीटंही मिळणं कठीण आहे. आयमॅक्स तर पूर्णपणे बुक झालं आहे. अगदी मोजक्या सीट उफलब्ध आहेत. दिल्लीमध्येही थोड्याफार प्रमाणात अशीच स्थिती आहे.

2500 रुपयांचं तिकीट

मुंबईतील परेलमधील एका थेअटरमध्ये 'ओपनहायमर'चं तिकीट तब्बल 2450 रुपयांना विकलं गेलं आहे. टॅक्ससहीत हे तिकीट 2500 रुपयांचं आहे. जास्त किंमत असलेल्या रिक्लायनर सीटही पूर्ण बुक झाल्या आहेत. केवळ शुक्रवारच नाही तर पूर्ण विकेण्डच्या सीट बुक असल्याचं ऑनलाइन दिसत आहे.