Shreyas Talpade Career: प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला रूग्णालयात दाखल केलंय. श्रेयसने केवळ मराठी सिनेमाच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या भूमिकेने ठसा उमटवला आहे. हिंदी चित्रपटसृष्टी, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत श्रेयस तळपदेचं कामवाखाणण्याजोगं आहे.
इक्बाल हा चित्रपट श्रेयसच्या कारकिर्दीतील मोठा आणि महत्त्वाचा ठरला असला तरी, पुष्पा या सिनेमाने त्याला खऱ्या अर्थाने स्टारडम मिळालं असं म्हणायला हरकत नाही. श्रेयस तळपदेने पुष्पा मधील अल्लू अर्जुनच्या पात्रासाठी हिंदीत डब केलं होतं. श्रेयसच्या आवाजाचे हिंदी प्रेक्षक चाहते झाले होते. पण तुम्हाला माहिती आहे का की, श्रेयसच्या करिअरमध्ये एक असा काळ होता जेव्हा त्याने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस तळपदेने 1998 मध्ये मराठी टीव्ही शो 'वो'मधून त्याच्या करिअरयला सुरुवात केली होती. यानंतर अभिनेत्याने अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं पण त्यावेळी त्याला हवं तसं काम मिळालं नाही. ज्यावेळी श्रेयसने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर नागेश कुकुनूर क्रिकेटवर चित्रपट बनवत असल्याची माहिती त्याला मिळाली. यावेळी तो वेगवान गोलंदाजाची भूमिका साकारण्यासाठी कोणाला तरी शोधतोय, हे श्रेयसला समजलं. आणि त्याचनंतर श्रेयस तळपदेला 'इकबाल' चित्रपट मिळाला आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
इकबाल या सिनेमानंतर, श्रेयस तळपदेने शाहरुख खानच्या ओम शांती ओम, गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, हाऊसफुल 2, पोस्टर बॉईज सारख्या अनेक कॉमेडी-ड्रामा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय, अभिनेत्याने पुष्पा आणि द लायन किंग या चित्रपटांच्या हिंदी डबसाठी आपला आवाज दिला आहे. श्रेयस तळपदे हा केवळ अभिनेता किंवा आवाज कलाकार नाही तर एक उत्कृष्ट दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. श्रेयसने 2021 मध्ये Nine Rasa नावाचा ओटीटी प्लॅटफॉर्म देखील तयार केला होता.
गुरुवारी रात्री मराठी अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याची शुटिंगनंतर अचानक तब्येत ढासळल्याची माहिती समोर आली. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचं शुटिंग सुरू असताना ही घटना घडली. शूटिंग संपल्यानंतर लगेचच तो बेशुद्ध पडला. त्यानंतर लगेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.