मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट तयार होत आहेत. अनेक मराठी चित्रपटांनी अगदी सातासमुद्रापार आपला डंका पोहचवला असून आता मराठी चित्रपटाचा राज्य आणि देशाबाहेरचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२१चं अमेरिकेतील न्यू जर्सी येथे आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या MIFF संचालिका नीता पेडणेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
'मराठी संस्कृती, कला, मूल्यं, परंपरा, संगीत यांचं अमेरिकेत जतन करणं हा या मराठी चित्रपट महोत्सवाच्या आयोजना मागील हेतू आहे. नेटफ्लिक्स आणि अॅमॅझॉन या ऑनलाईन, डिजिटल प्लॅटफॉर्मचंही या महोत्सवासाठी सहकार्य लाभणार असल्याचं' नीता यांनी सांगितलं.
या महोत्सवाच्या निवड समितीत कला दिग्दर्शक नीतिन चंद्रकांत देसाई आणि 'बकेट लिस्ट' चित्रपटाचे निर्माते अशोक सुभेदार यांचा समावेश आहे. मराठीत गेल्या काही वर्षांपासून श्वास, सैराट, किल्ला, हरिश्चंद्राची फॅक्टरी, नटरंग, फॅन्ड्री, देऊळ, नटसम्राट, काकस्पर्श, कट्यार काळजात घुसली, नाळ या चित्रपटांसारखे काही खास, वेगळे आणि दर्जेदार चित्रपट निर्माण होत आहेत. श्वास आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटांची भारताची ऑस्करसाठीची विदेशी चित्रपट विभागात, अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली.
न्यू जर्सी मराठी चित्रपट महोत्सवात filmsfreeway.com येथे मोफत प्रवेश घेता येईल, अस या महोत्सवाच्या संचालिका नीता पेडणेकर यांनी सांगितलं आहे. तसंच अधिक माहितीसाठी www.marathiinternationalfilmfestival.org येथे संपर्क साधता येऊ शकतो.