मुंबई : सध्या देशात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. त्यामुळे राज्यात त्याचप्रमाणे केंद्रात देखील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाच 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता मयूर वकानीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. मयूर मालिकेत सुंदर लाल ही भुमिका साकारतो. अहमदाबादमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्याची प्रकृती पूर्वीपेक्षा उत्तम असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सेटवर देखील नियमांचं पालन करण्यात येत आहे.
एका मुलाखतीत मयूरच्या पत्नीने त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, 'मयूर मालिकेच्या चित्रीकरणासाठी गेले होते. त्यानंतर ते 7 मार्चला घरी परतले. एक दिवसानंतर त्याला कोरोनाची लक्षणं दिसून आली. थकल्यामुळे आणि प्रवासामुळे ताप आला असावा असं आम्हाला वाटलं.'
पण कोरोना चाचणी केल्यानंतर मयूरला कोरोनााची लागण झाल्याचं लक्षात आलं. असं मयूरच्या पत्नीने सांगितलं. तर महत्त्वाचं म्हणजे मयूरची पत्नी हेमाली वकानीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसने देशातच नाही तर संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे. राज्यात देखील रूग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सतर्क झालं आहे.