T-Series कंपनीच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; ऑफिस केलं सील

कोरोना रुग्णावर आंधेरीमध्ये उपचार सुरू आहेत

Updated: May 11, 2020, 07:08 PM IST
T-Series कंपनीच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; ऑफिस केलं सील  title=

मुंबई : भारतात कोरोना रुग्णांच्या आकड्यात सतत भर पडत आहे. रुग्ण बरे होत असले तरी नव्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही, त्यामुळे समस्त भारतीयांसाठी ही अत्यंत चिंतेचीबाब आहे. नुकताच T-Seriesचं ऑफिस देखील सील करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्यानंतर T-Series कंपनीने देखील आपलं ऑफिस बंद केलं होतं.  परंतु या काळात ऑफिसमध्ये राहणाऱ्या ८ कर्मचाऱ्यांपैकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून T-Seriesचं ऑफिस सील करण्यात आलं आहे. 

लॉकडाऊन घोषित केल्यानंतर T-Seriesचं ऑफिस बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर फक्त गरजेचे सामान घेण्यासाठी ऑफिस एक दिवस उघडण्यात आलं. सध्या सर्व कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. पण कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी आहेत. त्यांच्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती कंपनीच्या पीआरने झी न्यूजसोबत बोलताना दिली. 

सध्या या कोरोना रुग्णावर आंधेरीमध्ये उपचार सुरू आहेत शिवाया त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी चार जणांना देखील क्वारंटाइन करण्यात आलं आहे. अद्याप त्यांचे रिपोर्ट आलेले नाहीत. त्यामुळे अंधेरीमध्ये असलेल्या T-Series कंपनीला सील करण्यात आले आहे.