मुंबई : मैत्रीच्या विषयाला हाताळत आजवर बरेच चित्रपट बॉलिवूडमध्ये साकारण्यात आले आहेत. मुळात प्रेक्षकही या धर्तीवर आधारलेल्या चित्रपटांना तितकीत पसंती देतात. हीच बाब हेरत दंगल या चित्रपटानंतर दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी एक सोपी, साधी आणि तरीही मनाला भावेल अशी कथा ‘छिछोरे’च्या निमित्ताने सर्वांच्या भेटीला आणली. सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर, ताहिर राज भसिन, वरुण शर्मा, तुषार पांडे, वरुण पॉलिशेट्टी यांनी साकारलेली पात्र पाहताना प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या अशा पात्रांची आठवण आल्यावाचून राहत नाही.
‘अंदाज अपना अपना’, ‘3 इडियट्स’, ‘झिंदगी ना मिलेगी दोबारा’ अशा चित्रपटांमधून मैत्रीकडे पाहण्याचा आणि मित्रांना हाताळण्याचा जो दृष्टीकोन दाखवण्यात आला आहे, तोच दृष्टीकोन ‘छिछोरे’मध्येही पाहता येतो. चित्रपटाच्या सुरुवातीला करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाची आठवण झाल्यावाचून राहत नाही.
रुग्णालयातील दृश्य आणि कलाकारांचे संवाद पाहताना चित्रपटात पुढे काय होणार, कथानकाला कोणतं वळण मिळणार याच्याविषयी अंदाज बांधणं सोपं होऊन जातं. आपल्या मुलाला आजारपणातून बरं करण्यासाठी, मुळात तो अपयशी नाही याची जाणिव करुन देण्यासाठी त्याच मुलाच्या वडिलांच्या भूमिकेत असणारा सुशांत त्याच्या मित्रांची फौज आणतो. अर्थात ही फौज आता उतारवयात असली तरीही त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांमधले किस्से आणि करामती या अद्यापही तितक्याच तरुण आहेत, ज्यामुळे चित्रपटाला खरी रंगत येते.
‘मम्मी’ची भूमिका साकारणआरा तुषार पांडे, ‘सेक्सा’च्या रुपात दिसणारा वरुण शर्मा आणि ‘डेरेक’च्या रुपात दिसणारा ताहिर राज भसिन यांच्या जोडीनेच खऱ्या अर्थाने सुशांतने साकारलेल्या मुख्य भूमिकेला उठावदार होण्यास खऱ्या अर्थाने आणखी वाव मिळताना दिसतो. मित्रांच्या मैत्रीत असणारी भाषा, हक्क गाजवण्याचा प्रत्येकाचा आपला अनोखा अंदाज आणि त्यातूनच आकारास येणारी रक्ताची नव्हे, तर जन्मभराची नाती पाहताना झालेल्या चुका माफ करत, रुसवेफुगवे दूर सारत पुन्हा एकदा मित्रांच्या टोळीने तिच धमाल केली पाहिजे, पुन्हा त्याच आनंददायी आणि खुरापती दिवसांमध्ये पोहोचलं पाहिजे असंच वाटू लागतं.
भूतकाळातील आठवणी सांगताना त्याला वर्तमानाशी जोडणाऱ्या या कलाकारांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि भावना इतक्या खऱ्या वाटू लागतात, की हे ‘छिछोरे’ नकळतच आपलेसे वाटू लागतात.
चित्रपटातील हलकेफुलके संवाद, सहजसोपे आणि प्रासंगिक विनोद (अपशब्दांपासून अगदी बोल्ड विनोदांपर्यंत... सारंकाही...)इतक्या ओघाओघाने समोर येतं की कुठेच ते ओढूनताणून आणलेत असं वाटत नाही. श्रद्धा कपूरची भूमिका आणखी प्रभावी करता आली असती. कथानकाच्या दृष्टीने तिला यात फारसा वाव देण्यात आलेला नाही. चिेत्रपटात अनेक कलाकार असले तरीही त्यांचं वेगळेपण जपण्यात आलं आहे. अर्थात मित्रांमध्ये पात्र असतातच अशी की प्रत्येकाची वेगळी बाजू ही सर्वांनाच हवीहवीशी वाटते. थोडक्यात काय, तर दिग्दर्शकाने ‘छिछोरे’ साकारत आपल्या भेटीला आलेली मित्रांची टोळी नक्की आहे तरी कशी, हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट तुमच्या ‘छिछोरे’ गँगसह नक्की पाहा.
दिग्दर्शक- नितेश तिवारी
निर्मिती- साजिद नाडियादवाला
कलाकार- सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, तुषार पांडे, नवीन पॉलिशेट्टी, ताहिर भसीन, प्रतीक बब्बर आणि इतर....