सावरकरांचे नाव नेताजींसोबत जोडू नका; सुभाषचंद्र बोस यांच्या पणतुने टोचले रणदीप हुड्डाचे कान

Savarkar Film Controversy: रणदीप हुड्डा याची प्रमुख भूमिका असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट 22 मार्च रोजी रिलीज होत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 6, 2024, 12:42 PM IST
सावरकरांचे नाव नेताजींसोबत जोडू नका; सुभाषचंद्र बोस यांच्या पणतुने टोचले रणदीप हुड्डाचे कान title=
subhash chandra bose grand nephew warns randeep hooda to not link their names in his film

Savarkar Film Controversy: रणदीप हुड्ड्याचा बहुप्रतीक्षीत सिनेमा स्वातंत्र्यवीर सावरकर याच्या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. मात्र ट्रेलर रिलीज होताच या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सावरकर चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यापासून या चित्रपटाबाबत खूप उत्सुकता होती. या चित्रपटात रणदीप हुड्डाच्या अभिनयानेही लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, चित्रपट रिलीज व्हायच्या आधीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पणतुंनी रणदीप हुड्डासाठी एक पोस्ट लिहली आहे. 

सावरकरांच्या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजबरोबरच वादाची मालिकादेखील सुरू होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी चित्रपटाचा टीजर रिलीज झाला होता. तेव्हादेखील मोठा वाद रंगला होता. त्यानंतर आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतु चंद्र कुमार बोस यांनी सावरकर चित्रपटाबाबत रणदीप हुड्डाला उद्देशून एक पोस्ट लिहली आहे. 

सावरकर चित्रपटात रणदीप हुड्डाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. तर, चित्रपटात स्वातंत्र्यसंग्रामात मोलाची भूमिका बजावणारे अनेक क्रांतीवीरांची झलक दिसत आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासह नेताजी सुभाषचंद्र बोस ही पात्रेही सिनेमात दिसत आहेत. ट्रेलरमध्ये सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यातील एक दृष्य आहे. 

सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यातील एक संवाद ट्रेलरमध्ये आहे. यात सावरकर नेताजींना सांगत आहेत की, जर्मनी आणि जापानचे आधुनिक हत्यारे घेऊन इंग्रजांवर हल्ला करावा. असा एक संवाद आहे. यानंतरच नेताजींच्या पणतुंनी यावर आक्षेप घेत रणदीप हुड्डाच्या या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली आहे. 

चंद्र कुमार बोस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहली आहे. त्यांनी अभिनेता रणदीप हुड्डांनादेखील टॅग केलं आहे. चंद्रकुमार बोस यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे की, रणदीप हुड्डा- सावरकर या चित्रपटासाठी मी तुमचं कौतुक करतो. पण योग्य व्यक्तीमत्व चित्रपटात दाखवणे खूप गरजेचे आहे. कृपया नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव सावरकरांसोबत जोडू नका. नेताजी एक सेक्युलर आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे लीडर होते आणि देशभक्तांचे देशभक्त होते. 

सावरकरांच्या टीजरवरही वाद

मागील वर्षी जेव्हा सावरकर चित्रपटाचा टीझर लाँच झाला होता तेव्हादेखील यावरुन मोठा वाद झाला होता. अनेकांनी इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत रणदीप हुड्डाला सोशल मीडियावर ट्रोल केले होते. चंद्रकुमार बोस यांनीही तेव्हा चित्रपटाबाबत आक्षेप घेतला होता. त्यांनी ANIला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की, सावरकरांच्या चित्रपटात नेताजी, भगतसिंह आणि खुदीराम बोस यांच्या दृश्याची काहीच आवश्यकता नाहीये. दरम्यान, 22 मार्च रोजी सावरकर चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.