कमल हसन यांच्या चित्रपटाच्या सेटवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

 माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

Updated: Feb 20, 2020, 08:41 AM IST
कमल हसन यांच्या चित्रपटाच्या सेटवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

चेन्नई : चित्रपटाच्या सेटवर लहानमोठे अपघात होत असतात. पण, ईव्हीपी फिल्मसिटीमध्ये बुधवारी रात्री झालेल्या एका अपघातात मात्र तिघांना आपले प्राण गमवावे लागले. क्रेन पडल्यामुळे या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, काहीजण यामध्ये दुखापतग्रस्त झाले आहेत. 

जेवणाची व्यवस्था पाहणारे मधू (२९), चंद्रन (६०) आणि सहायक दिग्दर्शक क्रिष्णा (३४) अशी मृतांची नावं असल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ज्यानंतर जखमींना लगेचच रुग्णालयात नेण्यात आलं. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनीही यावेळी मोलाचं सहकार्य केलं. सध्याच्या घडीला याप्रकरणाची नोंद पोलिसात करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार दिग्दर्शक शंकर यांच्या 'इंडियन २' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेट तयार करतेवेळी हा अपघात झाला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर, जवळपास नऊजण या अपघातात गंभीररित्या जखमी अवस्थेत असल्याचं कळत आहे. दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते कमल हसन हे या अपघातातून बचावले आहेत. 

चित्रपटाच्या सेटवर झालेल्या अपघातानंतर हसन यांनी ट्विट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. 'माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील हा सर्वात भयावह अपघात होता', असं म्हणत त्यांनी तीन सहकाऱ्याना गमावल्याचं दु:ख व्यक्त केलं. सोबतच आपण त्यांच्या कुटुंबासोबत या दु:खाच्या प्रसंगात उभे असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

एकिकडे हसन यांनी या अपघाताविषयी ट्विट केलं असतानाच दुसरीकडे या चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर दुखापतग्रस्त झाल्याचं म्हटलं जात होतं. पण, आपण अगदी सुखरुप असल्याचं पुढे त्यांनी स्पष्ट केलं. चित्रपटांच्या सेटवर झालेला हा भीषण अपघात पाहता सेटवर काम करणाऱ्यांची सुरक्षितता, संभाव्य अपघात आणि त्यापासून बचावासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना या मुद्द्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.