'प्यार का नगमा' गाण्याचे गीतकार आजही जगत आहेत हलाखीचं आयुष्य

रेल्वे स्टेशनवर हे गाणं गाणाऱ्या रानू मंडल प्रसिद्ध झाल्या; पण.... 

Updated: Aug 26, 2019, 12:02 PM IST
'प्यार का नगमा' गाण्याचे गीतकार आजही जगत आहेत हलाखीचं आयुष्य  title=
फोटो : व्हिडिओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : मीम्स, व्हायरल व्हिडिओ, असंख्य फोटो आणि न जाणे काही ना काही शेअर केल्या जाणाऱ्या सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ चांगलाच गाजला. अनेकांनीच तो शेअरही केला. हा व्हिडिओ इतका मोठ्या प्रमाणात सर्वांपर्यंत पोहोचला की त्यात गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांना थेट बॉलिवूडमधूनच मदतीला हात पुढे केला गेला. 

ज्येष्ठ गायिका आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या 'एक (इक) प्यार का नगमा है....' या अजरामर गाण्याला रानू यांनी आपल्या अंदाजात सादर केलं. ज्यानंतर सर्वच स्तरांतून त्यांच्या गायनकौशल्याची प्रशंसा करण्यात आली. सुरेल आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या रानू सध्याच्या घडीला अशा काही प्रसिद्धीझोतात आल्या, की त्यांच्यासाठी हे जणू सेलिब्रिटीपणच... 

रानू यांना ज्या गाण्यामुळ खऱ्या अर्थाने असंख्यजणांमध्ये एक वेगळी ओळख मिळवून दिली, त्या गाण्याचे मूळ गीतकार मात्र आजही या झगमगाटापासून आणि प्रसिद्धीपासून दूर आहेत. हल्लीच पार पडलेल्या एका कवी संमेलनात या गाण्याचे गीतकार संतोष आनंद यांनी हजेरी लावली होती. त्याचवेळी त्यांनी 'दैनिक भास्कर'शी संवाद साधला. वाढतं वय आणि एकाकी जीवन यामुळे ते सध्या या लखलखाटापासून दूर आहेत. 

'मला इतरांकडून कळत आहे, की मी लिहिलेलं गाणं गाऊन एका महिलेला हिमेश रेशमियाने एक संधी दिली आहे. पण, माझ्याकडे मात्र तिचं गाणं पाहण्यासाठी साधा स्मार्टफोनही नाही', असं ते म्हणाले. 

१९९५ नंतरच आपण चित्रपटांगसाठी गीतं लिहिणं बंद केलं होतं असं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. मुलगा आणि सुनेच्या आत्महत्येनंतर आपण स्वत:ला घरातच कोंडून घेतल्याचं सांगत बऱ्याच वर्षांनंतर मित्रांच्या  विनंतीचा मान राखत आपण पुन्हा एकदा काव्यलेखनास सुरुवात केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

हल्लीच्या दिवसांमध्ये कलेवर पैशाचं सावट दिसू लागलं आहे, असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. आपण घरखर्च चालवण्यासाठी कवी संमेलनांना हजेरी लावत असल्याचं मनाला चटका लावून जाणारं वास्तचवही त्यांनी सर्वांसमोर ठेवलं. एकेकाळी लक्ष्मीकांत- प्यारेलाल या अतिशय लोकप्रिय संगीतकार जोडीसाठी गीतं लिहिणारा हा चेहरा आज, प्रसिद्धीझोतापासून कैक मैल दूर आहे. पण, याच कलाकारांमुळे आज कलेचा दर्जा उच्च स्तरावर पोहोचला होता, हे मात्र विसरुन चालणार नाही. त्यामुळे अशा कलाकारांच्या मदतीसाठीही कलाविश्वाने पुढे येणं अपेक्षित आहे.