जिन्यावरुन पडून 29 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री ब्रेन डेड! पालकांनी घेतला Organ Donation चा निर्णय

29 Year Old Actress Fall From Stairs, Died: या अभिनेत्रीनं 2018 साली मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. दोन अल्बम आणि एका टीव्ही शोमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र घरात झालेल्या एका विचित्र अपघातामुळे तिचा मृत्यू झाला. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 13, 2023, 11:27 AM IST
जिन्यावरुन पडून 29 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री ब्रेन डेड! पालकांनी घेतला Organ Donation चा निर्णय title=
तिने वयाच्या 29 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप (फोटो - ट्वीटरवरुन साभार)

Park Soo Ryun Died: प्रसिद्ध कोरियन अभिनेत्री पार्क सू रयूनचं (Park Soo Ryun) आकस्मिक निधन झालं आहे. पार्क सू रयून ही केवळ 29 वर्षांची होती. समोर आलेल्या माहितीनुसार 11 जून रोजी पार्क घरातील जिन्यावरुन पडली. या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने तिला लगेच जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं. या ठिकाणी तिच्यावर तातडीने उपचार करुन तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड (Brain Dead) घोषित केलं. विशेष म्हणजे 12 जून रोजी पार्क सू रयूनचा जेजू बेटांवरील एका कार्यक्रमामध्ये खास परफॉरमन्स होणार होता. अचानक एवढ्या तरुण आणि हरहुन्नरी अभिनेत्रीचा असा दुर्देवी मृत्यू (Park Soo Ryun Died) झाल्याने जगभरातील कोरियन ड्रामा चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

पालकांनी घेतला अवयवदानाचा निर्णय

पार्क सू रयूनच्या नातेवाईकांनी तिच्या निधनानंतर अवयदान करण्याचा निर्णय घेतला आहे. 'सोम्पी'ने दिलेल्या वृत्तानुसार पार्क सू रयूनच्या आईने, "तिला केवळ ब्रेन डेड घोषित करण्यात आलं आहे म्हणजेच तिचा केवळ मेंदू निष्क्रीय झाला आहे. तिचं हृदय सुरळीतपणे काम करत आहे. जगात मेडिकल इमर्जन्सीमध्ये असं नक्की कोणीतरी असेल ज्याला अवयवांची फार आवश्यकता असेल. तिचे आई-वडील म्हणून सध्या आम्हाला याचाच विचार करुन फार आनंद होत आहे की तिचं हृदय इतर कोणाच्या तरी शरीरात धडधडत असेल," अशी प्रतिक्रिया नोंदवली.

अल्पावधित झाली लोकप्रिय

पार्क सू रयूनने सन 2018 साली एल टेनोरी नावाच्या चित्रपटामधून कोरियन सिनेसृष्टीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. फाइंडिंग मिस्टर डेस्टीनी, द डेज वी लव्ह्ड यासारख्या म्युझिक अल्बममधून ति लोकप्रिय झाली. त्यानंतर तिने 'स्नोड्रॉप' नावाच्या कार्यक्रमातही काम केलं. याच कार्यक्रमामध्ये ती अधिक लोकप्रिय झाली आणि तिला नवीन ओळख मिळाले. सोशल मीडियावर तिने या कार्यक्रमातील भूमिकेबद्दलच्या पोस्ट केल्या होत्या. या कार्यक्रमात माझी भूमिका अगदी छोटी होती तरी सेटवर माझी फार काळजी घेण्यात आली. तसेच अभिनेता जुंग हेईबरोबर मला काम करण्याची पुन्हा संधी मिळेल अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली होती. पार्क सू रयूनचं शरीर सध्या सुवोन येथील रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलं आहे. तिच्यावर 13 जून रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार पार पडतील असं सांगण्यात आलं आहे.