Singer Died On Stage: सकाळी घराबाहेर पडलेली व्यक्ती रात्री घरी सुखरुप येईल की नाही सांगता येणं कठीण असतं असं म्हटलं जातं. आजच्या धावपळीच्या जीवानामध्ये खरोखरच कोणाला कुठे काय होईल नेमकं सांगता येणार नाही. हल्ली तर अगदी दररोज वृत्तपत्रे, टीव्ही आणि सोशल मीडियावर अचानक लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या ऐकायला आणि वाचायला मिळतात. असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. या घटनेचे व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे.
झालं असं की, बुधवारी (13 डिसेंबर 2023 रोजी) सायंकाळी प्रसिद्ध ब्राझीलीयन गायक पेड्रो हेनरिकचा शो सुरु होता. मात्र स्टेजवर गाणं गात असताना अचानक पेड्रो खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला आहे. मात्र हा व्हिडीओ पाहून पेड्रोच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून आपला आवडता गायक अशाप्रकारे कसा काय आपल्याला सोडून जाऊ शकतो असा प्रश्न त्यांना पडला आहे.
बुधवारी 30 वर्षीय पेड्रो ब्राझीलमधील एका धार्मिक कार्यक्रमामध्ये परफॉर्म करत होता. गाणं गाताना तो अगदी उत्साहामध्ये हातवारे करुन समोर असलेल्या चाहत्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्नही करत होता. मात्र अचानक अगदी तोल गेल्याप्रमाणे तो हातात माईक असतानाच स्टेजवर पडला. काही क्षणांपूर्वी उडा मारत गाणं गाणारा पेड्रो बेशुद्ध होऊन स्टेजवर पडल्यानंतर त्याला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रावर नेण्यात आलं. मात्र पेड्रोला मृत घोषित करण्यात आलं.
स्टेजवर परफॉरन्ससाठी जाण्याआधी पेड्रोने त्याच्या मित्राला, 'मला फार थकल्यासारखं वाटत आहे,' असं म्हटलं होतं. पेड्रोची गाणी प्रदर्शित करणाऱ्या म्युझिक कंपनीने रेडिओ 93 बरोबर बोलताना घटनेसंदर्भातील सविस्तर माहिती दिली. पेड्रोला हार्ट अटॅकचा मोठा झटका आला. त्यातच त्याचा मत्यू झाला. पेड्रो हा फारच उत्तम गायक होता. त्याचे सर्वांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते, असंही कंपनीने श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं आहे.
30-year-old singer Pedro Henrique just collapsed and died on stage.
The new normal is not normal.
— End Wokeness (@EndWokeness) December 14, 2023
पेट्रोच्या मागे त्याची पत्नी सुईलान बॅर्टो आणि 2 वर्षांची मुलगी झोई असा परिवार आहे. पेड्रोने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गाण्याचा सराव सुरु केला होता. 2015 मध्ये युट्यूबवर अनेक व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्याच्या प्रोफेशनल करिअरला सुरुवात झाली होती. त्यानंतर त्याने एक लोकल बॅण्डबरोबर काम करण्यास सुरुवात केली. 2019 पर्यंत या बॅण्डबरोबर काम केल्यानंतर पेड्रोने स्वत: एकट्याने कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली. गुरुवारी पेट्रो त्याच्या युट्यूब चॅनेलवरुन एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च करणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.