भारतीय नागरिकत्व मिळवून दिलेल्या सुषमांच्या निधनाने अदनान सामी भावुक

अदनान सामीची भावनिक पोस्ट

Updated: Aug 7, 2019, 01:54 PM IST
भारतीय नागरिकत्व मिळवून दिलेल्या सुषमांच्या निधनाने अदनान सामी भावुक title=

मुंबई : प्रखर वक्ता आणि भाजपाच्या भक्कम नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांकडूनच दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. गायक अदनान सामीनेही सुषमा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अदनानने ट्विटरवर सुषमा यांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

'सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या बातमीने मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला आहे. या बातमीवर विश्वासच बसत नाही. सुषमा या माझ्यासाठी आईप्रमाणे होत्या. त्या एक सन्माननीय, निष्णात राजकीय व्यक्तिमत्त्व होत्या. एक प्रखर वक्ता, अतिशय प्रेमळ आणि दयाळू होत्या. तुमची नेहमी आठवण येईल.' असं म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मूळचा पाकिस्तानी असलेल्या गायक अदनान सामीने २०१५ मध्ये भारताचं नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या. त्यांच्या मदतीने अदनानला जानेवारी २०१६ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळालं. 

जावेद अख्तर, शबाना आजमी, अनुष्का शर्मा, रितेश देशमुख, अर्जुन कपूर, परिणीती चोप्रा, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि इतरही अनेक कलाकारांनी सुषमा यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे. 

सुषमा स्वराज यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्काने एम्स रुग्णालयात निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. शारीरिक अस्वास्थ्यामुळे त्यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला होता.