'हा तुच ना...?' म्हणत बांदेकरांचा शरद पोंक्षेंना सवाल; एकनाथ शिंदेंवरून दोन मित्रांमध्ये जुंपली

तिथे एकनाथ शिंदे यांना आमदारांचं पाठबळ मिळत असताना इथे सोशल मीडियावरही त्यांच्या पाठींब्यासाठी काही पोस्ट केल्या गेल्या. 

Updated: Jun 28, 2022, 10:19 AM IST
'हा तुच ना...?' म्हणत बांदेकरांचा शरद पोंक्षेंना सवाल; एकनाथ शिंदेंवरून दोन मित्रांमध्ये जुंपली title=
Shivsena Aadesh Bandekar Old Video Of war with actor Sharad Ponkshe On Eknath Shinde Post

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि त्यानंतर राज्याच्या मंत्रीपदाची धुरा सांभाळणारे एकनाथ शिंदे पक्षातून बाहरे पडले. त्यांच्यामागोमाग काही आमदारांनीही पक्षाशी बंडखोरी केली. पाहता पाहता हे प्रकरण इतकं पेटलं की सत्तेच असणारा महाविकास आघाडीचा डोलारा कधीही कोसळेल अशा परिस्थितीत येऊन पोहोचला. (Shivsena Aadesh Bandekar Old Video Of war with actor Sharad Ponkshe On Eknath Shinde Post)

तिथे एकनाथ शिंदे यांना आमदारांचं पाठबळ मिळत असताना इथे सोशल मीडियावरही त्यांच्या पाठींब्यासाठी काही पोस्ट केल्या गेल्या. यादरम्यानच वक्ते आणि अभिनेते म्हणून ओळख असणाऱ्या शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट केली. 

पोंक्षेंनी केलेल्या या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह खुद्द शरद पोंक्षेही दिसत आहेत. कॅन्सरनं आपल्याला ग्रासलेलं असताना शिंदेनी नेमकी कशी मदत केली याचा खुलासा पोंक्षे इथं करताना दिसत आहेत. सत्तासंघर्ष पेटलेला असतानाच त्यांनी केलेली ही पोस्ट पाहता अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 

याच पोस्टचा संदर्भ घेत आदेश बांदेकर यांनीही एक व्हिडीओ पोस्ट केला. जिथं ते कॅन्सरच्या दिवसांमध्ये आपल्या मदतीला आदेश बांदेकर धावून आल्याचं म्हटलं होतं. आपल्या मदतीला सर्वप्रथम आदेश बांदेकर उभे राहिल्याचं त्यांनी सांगितलं. 

त्यांचा हाच व्हिडीओ शेअर करत बांदेकरांनी कॅप्शनमध्ये, 'हा शरद पोंक्षे तुच ना?' असा बोचरा सवाल त्यांना केला. बांदेकरांची ही पोस्ट पाहता याला उत्तर देत पुन्हा पोंक्षेंनी एक पोस्टवजा पुरावाच सादर केला. 

जिथं त्यांनी पुस्तकातील पान आणि बांदेकरांबद्दलचं त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं, याची माहिती दिली. 'शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही', असं त्यांनी लिहिलं. कधीएकेकाळी मित्रासाठी मित्रानंच केलेल्या या मदतीला आता राजकीय वादाचं वळण मिळालं आहे, असंच या बाबतीत म्हणणं वावगं ठरणार नाही.