शिवसेना नानांच्या पाठिशी उभी, म्हणे त्यांची बाजूही तितकीच महत्त्वाची

अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी मात्र याप्रकरणी प्रतिक्रिया देणं टाळलं.

Updated: Oct 2, 2018, 06:19 PM IST
शिवसेना नानांच्या पाठिशी उभी, म्हणे त्यांची बाजूही तितकीच महत्त्वाची title=

मुंबई: नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने काही दिवसांपूर्वी केला होता. एका मुलाखतीत तिने या प्रसंगाविषयी वाच्यता केली. 
तिच्या या वक्तव्यानंतर कलाविश्वातही दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं. सोनम कपूर, कोंकणा सेन, अनुराग कश्यप, रिचा चड्ढा, रेणुका शतहाणे, कंगना रणौत या साऱ्यांनी तनुश्रीची साथ दिली.

अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी मात्र याप्रकरणी मौन पाळण्यास प्राधान्य दिलं. 

आपल्यावर होणारे हे सर्व आरोप आणि त्यामुळे तोंड वर काढणाऱ्या चर्चा पाहता एका पत्रकार परिषदेचं आयोजन करत त्यामधूनच सर्वकाही उघड करण्याचं नानांकडून सांगण्यात आलं होतं. 

अर्ध्याहून अधिक कलाविश्वाने या अडचणीच्या वेळी नानांची साथ सोडलेली दिसत असतानाच शिवसेनेने मात्र त्यांची साथ सोडलेली नाही. 

संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य पाहून असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

'नाना पाटेकर हे बॉलिवूडमधील एक नामवंत कलाकार आहेत. त्यांना आम्ही फार आधीपासून आणि खुप चांगल्या पद्धतीने ओळखतो. माझ्या मते आपण त्यांची भूमिकाही ऐकून घेतली पाहिजे', असं ते म्हणाल्याचं वृत्त 'टाईम्स नाऊ'ने प्रसिद्ध केलं आहे.

नानांनी तिला कायदेशीर नोटीसही पाठवल्याचा मुद्दा त्यांनी या.वेळी अधोरेखित केला. त्यामुळे आता या प्रकरणाला आणखी एक वळण मिळालं आहे हे नाकारता येणार नाही. 

दरम्यान, एकिकडे नानांनी तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवून तिने आपली माफी मागावी असं त्या माध्यमातून म्हटल्याच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे आपल्याला अशी कोणतीही कायदेशीर नोटीस मिळालीच नसल्याचं तनुश्रीने स्पष्ट केलं आहे.