मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शमिका शेट्टी आपला आगामी सिनेमा द टेनंट बद्दल अतिशय उत्सुक आहे. या सिनेमाची कथा लॉस एंजिलिसमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाचा फिल्ममेकर सुश्रुत जैनने लिहिली असून सिनेमाचे दिग्दर्शनही तो करणार आहे. द टेनंट ही अशा एका महिलेची कथा आहे जिचा भूतकाळ अतिशय रहस्यमय आहे. मध्यमवर्गीय आवासीय सोसायटीत आल्यानंतर तिच्या आयुष्यात खूप सारी उलथापालथ होते, अशा महिलेची भूमिका शमिका साकारणार आहे.
या सिनेमाबद्दल बोलताना शमिकाने आयएएनएसला सांगितले की, मी सिनेमाची तयारी सुरु केली आहे आणि मला हे खूप आवडत आहे. नवीन काही शिकण्याची ही खूप चांगली संधी आहे. शूटिंगची मी आतुरतेने वाट बघत आहे. या महिनाअखेरीसपासून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल.
यापूर्वी सुश्रुत जैन यांनी बियॉन्ड ऑल बाऊंड्रीज आणि अंधेरी हे सिनेमे केले होते.