मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान आणि त्याचे संपूर्ण कुटूंब सध्या एका कठीण प्रसंगातून जात आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून इरफान खान न्यूरोएंड्रोक्राइन कॅन्सरशी दोन हात करत आहे. या आजारावर उपचार घेण्यासाठी इरफान लंडनमध्ये आहे. इरफान लवकर बरा व्हावा म्हणून चाहत्यांपासून मोठ्या सेलिब्रिटीपर्यंत सगळेच प्रार्थना करत आहेत. मात्र शाहरूख खानने इरफानला या काळात केलेली मदत खूप कौतुकास्पद आहे. रिपोर्टनुसार इरफान शाहरूख खानला खूप जवळचा मानतो.
ई-स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात इरफान खान लंडनला जाण्याअगोदर पत्नी सुतापाने शाहरूख खानला आपल्या घरी भेटायला बोलावलं होतं. सुतापाने शाहरूखला फोन करून सांगितलं होतं की, इरफानला त्याला भेटायचं आहे. शाहरूख आपलं मेहबूब स्टुडिओतील शुटिंग संपवून इरफान खानला मड आयलँडमधील घरी भेटायला गेला. दोन तास या दोघांमध्ये चर्चा झाली. एवढंच काय तर जाण्याअगोदर शाहरूख खानने आपल्या लंडनच्या घराची चावी इरफान खानला दिली. सुरूवातीला इरफान ही चावी घेत नव्हता पण शाहरूखने खूप आग्रह घेतल्यावर चावी घेतली. इरफानच्या कुटुंबाने आपल्या लंडनच्या घरात मोकळेपणाने रहावं असं शाहरूखला वाटंत होतं.
मला हाय-ग्रेड न्युरोएण्डोक्राइन कॅन्सर आहे असं निदान होऊन आता बराच काळ झालाय. माझ्या शब्दसंग्रहात सामील झालेलं हे नवीन नाव म्हणे खूपच दुर्मीळ आहे. साहजिकच अभ्यासासाठी अत्यंत कमी केसेस आणि तुलनेने कमी माहिती यामुळे उपचारांबाबतही खूप अनिश्चितता आहे. एकंदर मी एका ट्रायल अॅण्ड एरर खेळाचा भाग आहे.
मी खरं तर वेगळ्याच खेळात रमलेलो होतो, एका वेगवान ट्रेनने प्रवास करत होतो. स्वप्नं होती, बेत होते, आकांक्षा होत्या, ध्येय होती. त्यातच गुंतलेले होतो. अचानक कोणीतरी माझ्या खांद्यावर थोपटलं आणि वळून बघतो तर तो टीसी होता. म्हणाला: "तुमचं स्टेशन आलंय जवळ. प्लीज उतरा ट्रेनमधून.” मी गोंधळून गेलो: "नाही, नाही, माझं स्टेशन नाही आलेलं.” “नाही, हेच तुमचं स्टेशन आहे. कधीकधी ते असंच येतं.”
या अचानक बसलेल्या धक्क्याने मला जाणीव करून दिली की मी तर समुद्रात तरंगणारा एक ओंडका आहे फक्त, अनिश्चित अशा प्रवाहात तरंगणारा! आणि मी जिवाच्या आकांताने त्या प्रवाहावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय.