'बलात्काऱ्यांना कंडोम द्या', म्हणणाऱ्या दिग्दर्शकावर 'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्री संतापली

डॅनियलने पोस्टमध्ये काय लिहिलं होतं?

Updated: Dec 6, 2019, 11:57 AM IST
'बलात्काऱ्यांना कंडोम द्या', म्हणणाऱ्या दिग्दर्शकावर 'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्री संतापली  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : साऱ्या देशात हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणी संतापाची लाट उसळली असतानाच डॅनियल श्रवण या दिग्दर्शकाच्या या प्रकरणीच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं. बालात्काराविषयी अतिशय क्रूर आणि असंवेदनशील प्रतिक्रिया देणाऱ्या दिग्दर्शकाने त्याची पोस्ट डिलीट केली. १८ वर्षांवरच्या वयोगटातील मुलींना बलात्काराविषयीसुद्धा माहिती करुन देणं गरजेचं असल्याचं म्हणत त्यानंतरच अशा पद्धतीच्या घटना होणार नाहीत असा सूर त्याने पोस्टमधून आळवला होता. 

डॅनियलने ही पोस्ट केल्यानंतर सर्व स्तरांतून त्याच्यावर संताप व्यक्त केला गेला. फक्त जनसामान्य किंवा नेटकरीच नव्हे, तर डॅनियल श्रवणच्या या सोशल मीडिया पोस्टचा संदर्भ आणि त्यात मांडलेली बाब पाहता त्याला वैद्यकीय तपासणी/ मदतीची गरज असल्याचं सेक्रेड गेम्स फेम अभिनेत्री कुब्रा सैत हिने ट्विट करत म्हटलं. त्याचं डोकं ठिकाणावर नसल्याचं म्हणत कुब्राने त्याच्यावर टीका केली. फक्त कुब्राच नव्हे, तर तिच्यापूर्वी गायिका चिन्मयी श्रीपदा  हिनेसुद्धा डॅनियलला त्याच्या या मताबाबत खडसावलं होतं.  

डॅनियलने पोस्टमध्ये काय लिहिलं होतं?

सरकारने कोणत्याही हिंसेशिवाय होणाऱ्या बलात्काऱ्यांना कायदेशीर मान्य दिली पाहिजे. ज्यामध्ये बलात्कारानंतर महिलांची हत्या केली जाणार नाही. १८ वर्षांवरील वयोगटातील मुलींना बलात्काराविषयीचं शिक्षण दिलं पाहिजे. तेव्हाच कुठे अशा प्रकारच्या घटना थांबतील. हा तर असा वेडेपणा झाला तिथे, तस्करी, हत्या अशा गोष्टी वीरप्पनला मारल्यामुळे थांबतील किंवा लादेनला मारल्यावर दहशतवादाला पूर्णविराम बसेल. अशाच पद्धतीने निर्भया कायद्यामुळे बलात्कारांचं प्रमाण आटोक्यात येईल असं नाही. 

मुख्य म्हणजे भारतीय मुलींना लैंगिक शिक्षण दिलं जाणं महत्त्वाचं आहे (जसं सोबत कंडोम बाळगणं) एक साधी गोष्ट आहे, पुरुषाची लैंगिक वासना पूर्ण झाली, तर तो महिलेला मारणार नाही, असं डॅनियलने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं होतं. या उघडपणे मांडण्यात आलेल्या मतांमुळे अनेकांनीच त्याच्यावर टीकेची झोड उठवली.