अभिनेत्रीचा पाठलाग, मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर असतानाच.... 

Updated: Dec 5, 2019, 08:04 PM IST
अभिनेत्रीचा पाठलाग, मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर असतानाच आता आणखी एका घटनेने लक्ष वेधलं आहे. चर्चगेट रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) २९ वर्षीय इसमाला टेलिव्हिजन अभिनेत्रीचा पाठलाग केल्याप्रकरणी आणि तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली आहे. यावेळी त्या अभिनेत्रीसोबत तिची एनआरआय मैत्रीणही होती अशी माहिती समोर येत आहे. शाहरुख शेख (२९) असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असल्याचं कळत आहे. वरळी येथील मरीयप्पा नगरचा तो रहिवासी आहे. दक्षिण मुंबईतील एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये आपण काम करतो असं त्याचं म्हणणं आहे. 

आगामी वेब सीरिजच्या कामात व्यग्र असणाऱ्या आणि 'स्प्लिट्सव्हिला' या रिऍलिटी शोची स्पर्धक असणाऱ्या २६ वर्षीय हर्षिता कश्यप हिला या प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. ती अंधेरीतील चार बंगला परिसरातील रहिवासी आहे. दरम्यान, या प्रसंगाविषयी 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या माहितीत हर्षिता म्हणाली, 'माझी २७ वर्षीय मैत्रीण, इशा पाला ही दक्षिण आफ्रिकेत राहते. ती वैद्यकीय पर्यटनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. २ डिसेंबरला तिने मला चर्नी रोड येथे असणाऱ्या सैफी रुग्णालयात बोलवलं होतं. त्यामुळे आम्ही लोकलनेच जाण्याचं ठरवलं कारण, रुग्णालय रेल्वे स्थानकापासून अगदी जवळ आहे. रुपारची वेळ असल्यामुळे लोकलमध्ये तशी गर्दी कमीच होती. तिचं काम संपल्यानंतर आम्ही साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी म्हणून रेल्वे स्थानकावर आलो. पाला तिकीट काढण्यासाठी म्हणून रांगेत उभी होती, तेव्हाच एक व्यक्ती सतत आम्हाला पाहत असल्याचं माझ्या लक्षात आलं. प्रथमत: आम्ही दुर्लक्ष केलं. पण, नंतर मात्र तो सतत आमच्याकडेच पाहत होता.'

इस एक्ट्रेस का पीछा कर रहा था अनजान शख्स! पुलिस ने अब किया गिरफ्तार

घडलेल्या प्रसंगाविषयी सांगताना हर्षिताने सांगितल्यानुसार जिना चढतेवेळीसुद्धा तो आपला पाठलाग करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. तेव्हात तिने त्याला रोखत 'तू आमच्याचकडे का पाहत आहेस' असं विचारलं. तेव्हा त्यानेही, 'मी तुमच्याकडे पाहतोय यात अडचण काय आहे?', असा प्रश्न केला. त्या पुढे चालत राहिल्या तरीही त्या व्यक्तीने त्यांचा पाठलाग करणं सुरुच ठेवलं. त्यानंतर त्याने हर्षिताच्या मैत्रिणीवर हात उगारला. हर्षिताच्या म्हणण्यानुसार तिनेही त्या इसमाला मारण्यास सुरुवात केली. तर, त्याने तिच्यावरही हात उगारला. त्याचवेळी तिथून जाणाऱ्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप केला. तितक्यात पोलिसांनी येऊन त्या इसमाला ताब्यात घेतलं. 

पोलिसांत तक्रार दाखल करतेवेळी त्या इसमाने रडण्यास सुरुवात केली. त्याच्या बहिणीने हर्षिता आणि तिच्या मैत्रीणीकडे याची तक्रार दाखल न करण्याची विचारणाही केली. पण, हर्षिता मात्र तिच्या भूमिकेवर ठाम राहिली.