'प्रवीण तरडेंना महाराष्ट्रात फिरु देणार नाही'

गणरायाच्या सजावटीच्या मुद्द्यावरुन नव्या वादाला सुरुवात   

Updated: Aug 23, 2020, 10:46 AM IST
'प्रवीण तरडेंना महाराष्ट्रात फिरु देणार नाही'  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेते प्रवीण तरडे यांनी यंदाच्या वर्षी गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी पुस्तक गणपती ही संकल्पना अंमलात आणली. या संकल्पनेअंतर्गत त्यांनी बुद्धीदेवता गणरायाला सर्वांच्या भेटीला आणण्याचा मानस मनी बाळगला होता. पण, असं करत असताना तरडे यांच्याकडून एक चूक झाली, ज्यामुळं त्यांना अनेकांच्याच रोषाचा सामना करावा लागला. यामध्ये आता रिपाईतर्फे तरडे यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असाच थेट इशारा देण्यात आला आहे. 

रिपाईंच्या सचिन खरात यांनी ट्विट करत आणि एका व्हिडिओच्या माध्यमातून तरडे यांचा निषेध केला आहे. 'प्रवीण तरडे हे जाणूनबुजून संविधानाचा अपमान करत आहेत. त्यांनी संविधानाच्या प्रतीवर गणपती बसऊन लोकशाहीचा अपमान केला आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरित कारवाई करावी ही विनंती', असं त्यांनी ट्विचमध्ये लिहिलं. 

'संविधान हे सर्वधर्म समभाव मानतं. संविधान कोणत्याही एका धर्माला प्राधान्य देत नाही. प्रवीण तरडे यांनी जाणुनबुजून यांनी भारताच्या संविधानाची प्रत ठेवून गणपती बसवला. या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. फक्त माफी मागून चालणार नाही, महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती करतो की त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा आमच्या पक्षातर्फे प्रवीण तरडे यांना आम्ही महाराष्ट्रात फिरु देणार नाही', असं खरात एका व्हिडिओमध्ये म्हणाले. 

नेमकं काय झालं होतं? 

यंदाच्या वर्षी तरडे यांनी पुस्तक गणपती या संकल्पनेअंतर्गत बुद्धिदेवता गणरायाचा पुस्तकांची आरास करत त्यात विराजमान केलं होतं. सोशल मीडियावर त्यांनी याचा फोटोही पोस्ट केला. पण, असं करताच त्यांच्यावर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली. पुस्तकांचा ढीग रचत तरडे यांनी ही आरास साकारली. पण, यामध्ये त्यांनी भारतीय संविधानावर पाट ठेवत त्यावर बाप्पांना विराजमान केलं. ही बाब अनेकांनाच खटकली. ज्यानंतर 'माझ्या घरी पुस्तक गणपती अशी संकल्पना होती. बुद्धिची देवता, बुद्धीचं प्रतीक अशी आणून दिलं', असं म्हणत आरपीआय, भीम आर्मी आणि लातूर, पुण्यातील काही संघटनांनी आपल्या ही चूक निदर्शनास आणून दिल्याचं तरडे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आपली चूक मान्य करत मूर्तीच्या बैठक व्यवस्थेत केलेला बदल सर्वांच्या लक्षात आणून दिला. पण, त्यांची ही जाहीर माफी काही या चुकेचं प्रायश्चित्त म्हणून पुरेशी पडलेली दिसत नाही.