मुंबई : प्रभास स्टारर बहुप्रतिक्षित, बहुचर्चित चित्रपट 'साहो'चं दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'साहो' चित्रपटातील प्रदर्शित झालेल्या 'इन्नी सोनी' या गाण्याला यूट्यूबवर चांगली पसंती मिळत आहे. प्रदर्शित झाल्यापासून काही वेळातच या गाण्याला लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा 'साहो' चित्रपट प्रदर्शित होण्यास काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे 'इन्नी सोनी' गाण्याच्या प्रदर्शनानंतर आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.
या गाण्यातून प्रभास आणि श्रद्धा यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
गुरु रंधवा याने हे गाणं लिहिलं असून त्यानेच या गाण्याला आवाजही दिला आहे. गुरु रंधवाशिवाय गायिका तुलसी कुमार यांनीही गाण्याला आवाज दिला आहे.
'साहो'मध्ये श्रद्धाने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी ती अतिशय उत्साही असल्याचंही तिने म्हटलंय.
सुजित दिग्दर्शित 'साहो' येत्या ३० ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'साहो' हिंदीशिवाय तेलुगू, तमिळ आणि मल्ल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे.