मुंबई : चाहत्यांच्या आणि विशेषत: तरुणींच्या मनावर राज्य करणारा 'दबंग खान', 'भाईजान', बॉलिवूडचा 'चुलबूल पांडे' म्हणजेच अभिनेता सलमान खान याचा नुकताच ५३ वा वाढदिवस पार पडला. कलाविश्वातील बऱ्याच सेलिब्रिटींनी भाईजानला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती. ज्यांना या बर्थडे बॅशला जाणं जमलं नाही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा दिल्या.
कुटुंबीयांच्या आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करणाऱ्या सलमानला शुभेच्छा देण्यासाठी आणखी एका खास व्यक्तीची उपस्थिती पाहायला मिळाली. ती व्यक्ती म्हणजे रोमानियन मॉडेल, अभिनेत्री लूलिया वंतूर. सलमानची तथाकथित प्रेयसी म्हणूनही लूलियाची ओळख आहे. त्याच्या आयुष्यातील या खास दिवसाला उपस्थित राहणाऱ्या लूलियाने सलमानसाठी खास भेटवस्तूही दिल्याचं कळत आहे.
'मिड डे'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार तिने सलमानला पारंपरिक प्रकारचं रोमानियन पेंडंट आणि सोनसाखळी भेट स्वरुपात दिली. सलमानने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये तो केक कापताना दिसत असून लगेचच अनेकांचं लक्ष त्याच्या गळातील सोनसाखळी आणि त्या पेंडंटवर जात आहे. आहे की नाही ही खास भेट?
आपल्या प्रियजनांनी दिलेल्या भेटवस्तू या ज्याप्रमाणे सर्वांसाठीच महत्त्वाच्या असताता त्याचप्रमाणे खुदद् सलमानही त्याला मिळालेल्या या खासभेटवस्तूंना तितकच महत्त्वं देतो, असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे लूलियाने सलमानला त्याच्या वाढदिवसाची भेट देण्यासोबतच त्याच्या कुटुंबीयांसाठीही ख्रिसमसच्या निमित्ताने काही खास आणि आकर्षक अशा भेटवस्तू दिल्याचं कळत आहे.