Ram Charan Break : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या आणि अभिनेता राम चरण गेल्या काही महिन्यांपासून यशाच्या परमोच्च शिखरावर आहे. राम चरण (Ram Charan) च्या आनंदाचं कारण संपूर्ण जगाला ठाऊक आहे. एस.एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटातील गाण्यानं जगभरात वाजवलेला डंका आणि थेट ऑस्करपर्यंत (Oscars) मारलेली मजल, हीच त्याच्या आनंदाची कारणं. त्याच्या या आनंदाचं आणखी एक कारण आहे, किंबहुना हे कारणही त्याच्या मनाच्या अतिशय जवळचं आहे. (rrr fame actor Ram Charan to take break from acting for wife Upasana)
आतापर्यंत तुम्हालाही याचा अंदाज आला असावा. कारण, या अभिनेत्यानं हे खास आणि तितकंच गोड कारणं कुणापासूनही लपवलेलं नाही. ते म्हणजे तो बाबा असल्याचं. या अभिनेत्याच्या घरी लवकरच बाळाचा प्रवेश होणार आहे. त्याची पत्नी उपासना गरोदर असून, आता काही दिवसांतच एक गोंडस बाळ या कुटुंबातील नवखं सदस्य ठरणार आहे. याच निमित्तानं सध्या खुद्द राम चरण आणि त्याची पत्नी काही महत्त्वाचे निर्णय घेताना दिसत आहेत.
मागील बऱ्याच काळापासून राम चरणसोबत विविध कार्यक्रमांना त्याच्या पत्नीनंही हजेरी लावली. किंबहुना या नाजुक काळात तो पत्नीची साथ क्षणभरही सोडताना दिसत नाहीये. त्यातच बाळाच्या जन्मानंतरही तिला पुरेसा वेळ देत आपल्या कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवण्याचा निर्णय त्यानं घेतला आहे. यासाठीच जवळपास तीन महिने किंवा त्याहून जास्त काळासाठी तो चित्रपट जगताला तात्पुरता रामराम ठोकणार आहे.
सिनेजगतातील माहिती प्रसिद्ध करणाऱ्या काही वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार मे महिन्याच्या अखेरीस राम आणि उपासना यांच्या बाळाचा जन्म होईल. यानंतरचा वेळ अभिनेता पत्नी, बाळ आणि कुटुंबासोबत व्यतीत करू इच्छितो. त्यामुळंच तो या निर्णयावर पोहोचला आहे. लग्नानंतर जवळपास 10 वर्षांनी या सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात ही गोड चाहूल लागल्यामुळं ते दोघंहीहा संपूर्ण काळ मनमुराद जगताना दिसत आहेत. हल्लीच त्यांनी मालदीवला जाऊनही काही निवांत क्षणांचा आनंद घेतल्याचं पाहायला मिळालं होतं.
काही दिवसांपूर्वीच एका संस्थेशी संवाद साधताना लग्नाच्या 10 वर्षांनंतरच गर्भधारणेचा निर्णय का घेतला, यामागचं कारण सांगितलं. 'मी आई होण्याचा निर्णय जेव्हा मला हवा होता तेव्हाच घेतला, समाजाच्या वाटण्या न वाटण्याचा इथं विचार केला नाही. मला वाटतं की हा योग्य वेळ आहे, आम्ही दोघंही आमच्या कारकिर्दीमध्ये एका चांगल्या टप्प्यावर आहोत', असं ती म्हणाली होती. योग्य वेळी घेतलेल्या या निर्णयानंतर आता ही जोडी त्यांच्या बाळाला जग दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. चाहतेही सध्या त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.