Renukaswamy Murder Case: कन्नड अभिनेता दर्शन हा हत्या प्रकरणामध्ये अटकेत आहे. आपला चाहता रेणुकास्वामीची हत्या दर्शनने केल्याचा आरोप आहे. दर्शनची पार्टनर आणि अभिनेत्री पवित्रा गोवडाबरोबर अन्य 15 जणांनी या गुन्ह्यामध्ये त्याला मदत केल्याचं सांगितलं जात आहे. आता या प्रकरणामध्ये एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. मृत रेणुकास्वामीने अभिनेत्री पवित्राला अश्लील फोटो आणि घाणेरडे मेसेज पाठवले होते अशी माहिती समोर आली आहे. पवित्रा ही अभिनेता दर्शनचं कौटुंबिक आयुष्य उद्धवस्त करत होती असं रेणुकास्वामीचं मत असल्याने त्याने हे मेसेजेस पाठवल्याचा दावा बुधवारी पोलिसांना कोर्टामध्ये सादर केलेल्या चार्ज शीटमध्ये केला आहे. या प्रकरणामधील तपास अधिकाऱ्यांनी थेट इन्स्टाग्रामकडून रेणुकास्वामीने केलेल्या मेसेजेसची माहिती मागवल्यानंतर चार्ज शीटमध्ये या मेसेजचा उल्लेख केला आहे.
पोलिसांच्या सुत्रांनी देलेल्या माहितीनुसार, रेणुकास्वामीचा मोबाईल त्याच्या हत्येनंतर सापडत नव्हता. आरोपींनी रेणुकास्वामीचा मोबाईल कालव्यामध्ये फेकून दिला होता. जून महिन्यामध्ये दर्शन, पवित्रा आणि त्यांच्या 15 चाहत्यांनी रेणुकास्वामीचा छळ करुन त्याची हत्या केली होती. याच प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी रेणुकास्वामीच्या नावावर असलेलं डुप्लिकेट सीम कार्ड तयार करुन त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरील तपशील गोळा केला आहे. त्यापूर्वी पोलिसांनी अग्निशामनदल आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने वृक्षाभवती कालव्यामध्ये रेणुकास्वामीचा मोबाईल शोधण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र त्यांना यामध्ये यश आलं नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनचा चाहता असलेल्या रेणुकास्वामीच्या मनात दर्शनची पार्टनर पवित्राबद्दल प्रचंड रोष होता. पवित्रामुळे दर्शनचं कौटुंबिक आयुष्य उद्धवस्त झालं असून त्याच्या पत्नीच्या समर्थनासाठी रेणुकास्वामी पवित्राला त्रास देत होता. रेणुकास्वामीने त्याच्या गुप्तांगाचा फोटो पवित्रा गोवडाला पाठवला होता. हा फोटो पाठवतानाच रेणुकास्वामीने पवित्राला मी दर्शनपेक्षा उत्तम आहे, असा मेसेज पाठवल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे. तो बराच काळ पवित्रा गोवडाला अश्लील मेसेज पाठवत होता.
हा त्रास सहन करण्यापलीकडे गेल्यानंतर पवित्रा गोवडाने दर्शनचा निकटवर्तीय असलेल्या पवनला याबद्दल सांगितलं. दर्शनला काहीही न कळवता हे प्रकरण निकाली लावण्याची विनंती पवित्राने पवनकडे केली. मात्र पवनने ही माहिती दर्शनबरोबर शेअऱ केली. दर्शनने पवनला पवित्राला त्रास देणाऱ्या शोधून आपल्या समोर हजर करावं असं सांगितलं. पवन रेणुकास्वामीबरोबर सोशल मीडियावरुन संवाद साधू लागला. याची पवित्राला काहीच कल्पना नव्हती. सोशल मीडियावरुन बोलताना पवनने रेणुकास्वामीबद्दलची माहिती गोळा केली. रेणुकास्वामी कुठे राहतो हे समजल्यानंतर दर्शन फॅन क्लब असोसिएशन ऑफ चित्रदुर्गचा अध्यक्ष राघवेंद्र आणि पवनने त्याचं अपहरण करण्याचं ठरवलं. राघवेंद्रने रेणुकास्वामीला तू जे काही केलं आहे त्यासाठी केवळ दर्शनची माफी माग तुला सोडून देऊ असं सांगितलं. या मोबदल्यात तुला दर्शनबरोबर सेल्फी काढण्याची संधीही दिली जाईल असं रेणुकास्वामीला सांगण्यात आलं.
रेणुकास्वामीने याबद्दल निर्णय घेतलेला नसतानाच दर्शनच्या चाहत्यांनी त्याला बळजबरीने रिक्षात बसवून त्याला चित्रदुर्ग शहराबाहेर उभ्या असलेल्या कारपर्यंत नेलं. त्यानंतर त्याला बंगळुरुमधील राजराजेश्वरी नगरमध्ये नेण्यात आलं. रेणुकास्वामीला इथे आणलं असल्याची माहिती दर्शनला देण्यात आली. दर्शन पवित्राबरोबर इथे आला आणि तो रेणुकास्वामीला मारहाण करु लागला. अनेक तास या सर्वांनी रेणुकास्वामीचा छळ केला. या टोळीने रेणुकास्वामीला इलेक्ट्रीक शॉक देण्यासाठी मशिन आणलं. या टोळीने रेणुकास्वामीच्या गुप्तांगाजवळ अनेकदा शॉक दिला. त्यानंतर त्याला पार्किंगमध्ये लाथांनी मारहाण करण्यात आली.
रेणुकास्वामीला अनेक ठिकाणी चटके देण्यात आले. रेणुकास्वामीला एवढी मारहाण कऱण्यात आली की तो रक्तबंबाळ झाला. संपूर्ण रात्रभर रेणुकास्वामीवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर या टोळीने मद्यपान केलं होतं. नशेमध्येच त्यांनी रेणुकास्वामीवर अत्याचार केले. गंभीर जखमी झालेला रेणुकास्वामीने प्राण सोडले. त्यानंतर दर्शन आणि इतरांनी रेणुकास्वामीचा मृतदेहाची विल्हेवाट लावून चौघांनी आर्थिक वादातून झालेल्या हाणामारीमध्ये रेणुकास्वामीचा मृत्यू झाल्याचं सांगत पोलिसांना शरण जाण्याचं ठरलं. मात्र पोलिसांनी हा डाव हाणून पाडत खरा प्रकार प्रकाशात आणला.
रेणुकास्वामी हा निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याचा मुलगा होता. तो आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबाच्या उदर्निवाहासाठी औषधांच्या दुकानात काम करायचा. तो घरातील एकुलता एक कमवता व्यक्ती होता. त्याच्या मागे पालक आणि गरोदर पत्नी असं कुटुंब आहे.