वयाच्या दहाव्या वर्षी पाळी आली अन् त्यानंतर...; रेणुका शहाणे यांनी सांगितला 'तो' अनुभव, 'काहीच कळत नव्हतं'

Renuka Shahane talks periods : अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडीओमध्ये त्या मासिक पाळीविषयी बोलताना दिसत आहेत.   

सायली पाटील | Updated: Jul 16, 2024, 01:45 PM IST
वयाच्या दहाव्या वर्षी पाळी आली अन् त्यानंतर...; रेणुका शहाणे यांनी सांगितला 'तो' अनुभव, 'काहीच कळत नव्हतं' title=
Renuka Shahane talks about getting periods at the age of 10 reveals its impact on her life

Renuka Shahane talks periods : मासिक पाळी... महिलांच्या शरीरात होणारे बदल आणि त्या बदलांचा कमीजास्त प्रमाणात महिलांच्याच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी हल्ली मोकळेपणानं बोललं जातं. काळ बदलला त्याप्रमाणं मासिक पाळीकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला. पण, जेव्हा हा काळ बदलत होता त्यादरम्यान नेमकी काय स्थिती होती. जेव्हा सॅनिटरी पॅड ही संकल्पना अस्तित्वात आणि भारतात वापरात आली तेव्हा काय स्थिती होती, या साऱ्यावर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मनमोकळा संवाद साधला आहे. 

We Are Yuvaa या पॉडकास्ट शोमध्ये शहाणे यांनी सुरुवातीच्या सॅनिटरी पॅडच्या जाहिरातीसाठी आपण जवळच्यांचा विरोध पत्करून काम केल्याचं सांगत स्वत:चाच एक अनुभव शेअर केला. वयाच्या 10 व्या वर्षी मला मासिक पाळी आली होती... असं सांगताना त्यांनी आता आपण 58 वर्षांचे असल्यामुळं जवळपास संपूर्ण आयुष्यच या मासिक पाळीसोबत व्यतीत केल्याचं सांगितलं. 

'वयाच्या 10 व्या वर्षी मला मासिक पाळी आली. विचार करा, मी आज 58 वर्षांची आहे. म्हणजे मी जवळपास संपूर्ण आयुष्य या पाळीसोबतच जगलेय. शारीरिकदृष्ट्या मी फार कमी वेळासाठी बालपण अनुभवलं. ते वयच असं असतं जेव्हा तुम्ही बौद्धिकदृष्ट्या तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांविषयी सजग नसता. सुदैवानं माझ्या आईनं एका आकृतीच्या माध्यमातून मला ही गोष्ट समजावून सांगितली होती. मी नशिबवान होते कारण या साऱ्याची चर्चा माझ्या घरी अगदी मोकळेपणानं होत होती. पण, नेमकं काय आणि का घडतंय हे मलाच कळत नव्हतं. फक्त इतकं माहित होतं, की हे जे काही घडतंय ते वाईट नाही आणि मला त्याचा त्रास होत नाहीये. मला याची खात्री पटवून देण्यात आली होती', असं सांगत रेणुका शहाणे यांनी त्यांच्या बालपणातील ते दिवस आठवले. 

शाळेत कोणालाही पाळी आली नव्हती आणि... 

आपल्या शाळेत, वर्गात कोणालाही पाळी आली नव्हती असं सांगताना त्यांनी पाळी येत असताना त्यादरम्यान मनातलं बोलण्यासाठी सोबत कोणी नव्हतं या भावनेनंच एकाकीपणा येऊ लागलेला असं सांगितलं. या साऱ्यामध्ये आपल्याला आईची साथ मिळाली असं सांगताना रेणुका शहाणे यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आपल्यावर मानसिक परिणाम झाल्याची बाब नाकारली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yuvaa (@weareyuvaa)

कमी वयात पाळी आल्यामुळं मी त्या वयात कोणाही मैत्रिणीशी त्याविषयी बोलू शकले नाही, मला माझ्या शरीरात होणारा हा बदल लपवून ठेवावा लागला आणि हीच गोष्ट पुढेही माझ्या जीवनात कायम राहिली. कारण, मी कायमच कशी दिसते, कशी पेहराव करते, माझा शरीराकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे याबाबत सतत विचार करत असते, काहीशी संकोचलेली असते असंही त्या म्हणाल्या. महिलांसह समाजामध्येच मासिक पाळी, समाजामध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या पॉडकास्टमध्ये अधोरेखित केला.