आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत 'रेडू'नं साधली हॅट्रिक

सागर वंजारी दिग्दर्शित रेडू या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत हॅट्रिक केली आहे. प्रतिष्ठेच्या तीन चित्रपट महोत्सवांसाठी हा चित्रपट निवडला गेला आहे. त्यात इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा विभागासह कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि इजिप्तमधील कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समावेश आहे. 

Updated: Nov 10, 2017, 12:34 PM IST
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत 'रेडू'नं साधली हॅट्रिक title=

मुंबई : सागर वंजारी दिग्दर्शित रेडू या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत हॅट्रिक केली आहे. प्रतिष्ठेच्या तीन चित्रपट महोत्सवांसाठी हा चित्रपट निवडला गेला आहे. त्यात इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा विभागासह कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि इजिप्तमधील कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समावेश आहे. 

नवल फिल्मचे नवल किशोर सारडा यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटात शशांक शेंडे, छाया कदम, गौरी कोंगे, विनम्र भाबल, मृण्मयी सुपल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद संजय नवगिरे यांचं आहे. मालवणी रुपांतर चिन्मय पाटणकर यांनी केलं आहे. विजय नारायण गवंडे यांनी संगीत आणि गुरू ठाकूर, विजय नारायण गवंडे यांनी गीतलेखन केलं आहे. दिग्दर्शनासह संकलनाची जबाबदारी सागर वंजारी यांनी निभावली आहे. तर छायांकन मंगेश गाडेकर, कला दिग्दर्शन नीलेश गोरक्षे, साऊंड डिझाईन पीयुष शहा यांचं आहे. नेहा गुप्ता आणि रुपेश जाधव कार्यकारी निर्माते आहेत.

प्रतिष्ठेच्या कैरो महोत्सवात इंटरनॅशनल कॉम्पिटिशन विभागात रेडूची निवड झाली आहे. या विभागात निवड झालेला रेडू हा एकमेव भारतीय चित्रपट आहे. कोलकाता महोत्सवात इंडियन कॉम्पिटिशन विभागासाठी रेडूची निवड झाली असून, स्पर्धेतील एकमेव मराठी चित्रपट आहे. या शिवाय इफ्फीसारख्या महत्त्वाच्या महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागातही निवड झाली आहे. 

सागर वंजारीनं या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. पदार्पणातच मिळालेल्या यशाविषयी सागर म्हणाला, 'एक उत्तम कथानक तितक्याच चांगल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न रेडू या चित्रपटाद्वारे केला. या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणं ही अत्यंत आनंदाची बाब आहे.'

निर्माते नवल किशोर सारडा यांचाही चित्रपट निर्मिती करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. 'बऱ्याच वर्षांपासून चित्रपट निर्मिती करण्याची इच्छा रेडूच्या रुपानं पूर्ण झाली. कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता चांगली कलाकृती करण्याचं स्वप्न होतं. रेडूच्या तीन आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये निवडीमुळे आमच्या प्रामाणिक प्रयत्नांचं चीज झालं आहे,' असं नवल किशोर सारडा यांनी सांगितलं.