Ratna Pathak Shah : कलाजगतामध्ये आजवर अनेक कलाकारांना त्यांच्या कामाच्या बळावर पुढे येण्याची आणि करिअरला आकार देण्याची संधी मिळाली आहे. अशा या कलाजगताचं समोर दिसणारं रुप हे अतिशय झगमगाटाचं आणि अनेकांनाच हेवा वाटण्याजोगं आहे. पण, रुपेरी पड्यामागे असणारा अंधकारही वास्तवाचीच एक बाजू आहे, हे नाकारता येणार नाही.
परिस्थिती कधीही बदलू शकते याची प्रचिती कलाजगतातील अनेक मंडळींना अनेकदा आली असून, त्यांनाही वाईट काळाचा सामना करावा लागला आहे ही बाबही तितकीच खरी. ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी नुकत्याच Brut ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आपल्या कारकिर्दीतील अशाच काळाविषयी वक्तव्य केलं आणि सिनेसृष्टीत हल्लीच्या दिवसांमध्ये काम मिळण्याचे निकष स्पष्ट केले.
श्याम बेनेगल यांच्या 'मंडी' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या रत्ना पाठक शाह यांना त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेनं वेगळेपण दिलं. पण, अभिनयातील याच 'रत्ना'ला हे कलाजगत तितक्याच वेगानं विसरलंसुद्धा. जवळपास वर्षभराचा काळ असा होता जेव्हा त्यांच्याकडे काहीच काम नव्हतं. त्याच दिवसांवर रत्ना पाठक यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उजेड टाकला.
हल्लीच्या दिवसांमध्ये अभिनेता किंवा अभिनेत्रींच्या कामापेक्षा त्यांच्या रुपावर अधिक भर दिला जातो, या वक्तव्यावर होकारार्थी उत्तर देत त्या म्हणाल्या, 'यासाठी कलाकारांना कितपत दोष द्यावा मला कळत नाही. कारण, त्यांना काही गोष्टींवर जाणीवपूर्वक अधिक लक्ष देण्यास सांगितलं जातं. हल्ली इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या आकड्यावरून कामं मिळतात. मी तरी असंच ऐकलंय. '
इन्स्टाग्राम आणि काम हे नवं समीकरण काहीसं न रुचल्यासा सूर आळवत रत्ना पाठक म्हणाल्या, 'मला तर कोणी विचारलंच नाही. कारण, मी इन्स्टाग्रामवरच नाहीय. बहुधा मला त्याच कारणामुळं काम मिळालं नाही. मी साधारण वर्षभरासाठी बेरोगार असण्याचं, माझ्याकडे एकही काम नसण्याचं हेच एक कारण असू शकतं.' सध्याच्या कलाकारांपैकी एखाद्याला खरंच अभिनय शिकायचा असेल तर त्यानं कुठं जायचं? हे सगळं कठीणच आहे.... अशा निराशाजनक स्वरात त्यांनी कलाजगताची सद्यस्थिती सर्वांपुढे मांडली.