'येक नंबर' चित्रपटात दिसणार राज ठाकरे? चित्रपटाचा ट्रेलर पाहिला का?

'येक नंबर' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्जा सुरु आहे. अशातच आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात राज ठाकरे दिसणार का? जाणून घ्या सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 26, 2024, 01:04 PM IST
'येक नंबर' चित्रपटात दिसणार राज ठाकरे? चित्रपटाचा ट्रेलर पाहिला का?  title=

Yek Number Movie Trailer: काही दिवसांपूर्वीच 'येक नंबर' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागलेली असतानाच आता ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

नुकताच झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित 'येक नंबर' या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज ठाकरे, बॉलिवूड अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, अविनाश गोवारीकर, साजिद नाडियाडवाला, साजिद खान, अभिजात जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या चित्रपटात राज ठाकरे स्वतः अभिनय करणार आहेत का?

खरंतर या चित्रपटाच्या पोस्टरपासूनच हा चित्रपट राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर ट्रेलर पाहून या चर्चेला पूर्णविराम लागला असून आपली प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी गावात राज ठाकरे यांना घेऊन येण्यासाठी मुंबईत निघालेल्या एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी यात पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. ट्रेलरमध्ये प्रतापचा राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा संघर्षमयी प्रवास दाखवला आहे. प्रताप त्याचे ध्येय साध्य करू शकेल का? या प्रश्नाची उकल येत्या 10 ऑक्टोबरला होणार आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. ती म्हणजे, या चित्रपटात राज ठाकरे स्वतः अभिनय करणार आहेत का? तर याचे उत्तरही प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. 

दरम्यान, 'येक नंबर' या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिची देखील झलक दिसत आहे. त्यामुळे 'येक नंबर' या चित्रपटामधून मलायका आरोराने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. तर सिद्धार्थ जाधवही या चित्रपटात झळकणार आहे. यापूर्वी चित्रपटातील 'जाहीर झालं जगाला' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सध्या या गाण्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. 'येक नंबर' हा चित्रपट म्हणजे एक कौटुंबिक, रोमँटिक लव्हस्टोरी, सस्पेन्स असे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे, हे नक्की!

'येक नंबर' चित्रपटाबाबत राज ठाकरे काय म्हणाले? 

चित्रपटाबद्दल राज ठाकरे म्हणतात, ज्याप्रमाणे इतर भाषेत भव्य चित्रपट बनत आहेत. तसेच मोठे चित्रपट आपल्या मराठीतही व्हावेत, असे आम्हाला सगळ्यांनाच वाटत होते आणि त्यातूनच 'येक नंबर' हा चित्रपट उभा राहिला आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो. काही नावे मी आवर्जून घेईन, त्यात आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी यांचे विशेष आभार, या चित्रपटासाठी वेळोवेळी आम्हाला त्यांचे सहकार्य लाभले. 'मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा' या एका वाक्यावर संपूर्ण टीम या चित्रपटाचा भाग झाली आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी सादर केली आहे.

या दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित 

झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, 'येक नंबर'चे तेजस्विनी पंडित, वर्धा नाडियाडवाला  निर्माते आहेत. येत्या 10 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.