Prasad Oak : लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक हा त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. प्रसादला फक्त त्याच्या अभिनयासाठी नाही तर दिग्दर्शनासाठी देखील ओळखला जातो. त्यानं दिग्दर्शन केलेला चित्रपट हा सुपरहिट ठरला. पण तुम्हाला माहित आहे का आज इतकी लोकप्रियता मिळवलेल्या प्रसाद ओकवर एकदा त्याचं घर विकण्याची वेळ आली होती. ते देखील अशा चित्रपटाच्यावेळी जेव्हा त्याला त्या चित्रपटासाठी एकीकडे राष्ट्रीय पुरस्कार मिळत होता आणि दुसरीकडे घर विकावं लागलं होतं. याविषयी प्रसादनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
प्रसादनं ही मुलाखत 'कॉकटेल स्टुडिओ'ला दिली. या मुलाखतीत प्रसादनं त्याला मिळालेल्या पहिल्या राष्ट्रीय पुरस्काराविषयी भाष्य केलंय. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कच्चा लिंबू' या चित्रपटाविषयी सांगत म्हणाला, "हा चित्रपट माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा भाग आहे. माझ्यासाठी हा चित्रपट नाही कारण त्यानं मला खूप काही दिलं आहे. यामुळे मी अनेक गोष्टी गमावल्या. दरम्यान, हा एक प्रवास आहे. ते म्हणतात ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’ ते तसंच आहे. थिएटरमध्ये तो चित्रपट एक-दोन आठवडे कसाबसा चालला. त्यानंतर तो काढण्यात आला. असं असलं तरी माझ्या आयुष्यातील पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता हे नशिब कोणत्या दिग्दर्शकाचं असतं? हा चित्रपट मी एका वेगळ्या विचारानं केला होता. यातून विशेष मुलांकडे पाहण्याचा समाजाचा असलेला जो दृष्टीकोन आहे, एखाद्या सण-समारंभात लोक त्या मुलांकडे कशा पद्धतीनं बघतात. त्या सगळ्याचा त्या मुलांच्या आई-वडिलांना किती भयंकर त्रास होतो. हेच कारण आहे की विशेष मुलं कोणत्या कार्यक्रमाला येत नाहीत, इतकंच नाही तर काही काळानंतर त्यांची मुलं देखील या सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणं टाळतात. या सगळ्यात त्या मुलांचा काय दोष असतो का? विशेष मुलांच्या आई-वडिलांना खूप भोगावं लागतं. त्यामुळे आपल्या समाजाचा हाच दृष्टीकोन बदलण्यासाठी मी हा प्रयत्न केला होता."
पुढे याविषयी सविस्तर सांगत प्रसाद ओक म्हणाला, "सगळ्याच चित्रपटांसाठी मी मेहनत घेतो त्यात कोणताही मोठेपणा नाही. पण त्या चित्रपटासाठी मी जवळपास दोन वर्ष मेहनत घेतली होती. त्यावेळी मी दुसरं कोणतंही काम केलं नाही. मुळात त्या वेळी मी दुसरं कोणतंही काम केलं नाही. त्यामुळे कर्जाचे हफ्ते हे जास्त झाले आणि बॅंकेतून माणसांचे फोन येऊ लागले होते. त्यावेळी मी काही कमावलंच नव्हतं. पण म्हणून बँकेचे हप्ते थांबत नाहीत ते चालूच राहतात."
घर का विकलं हे सांगत प्रसाद पुढे म्हणाला, "त्या दोन वर्षांमध्ये मी काम केलं नाही आणि त्याचा सगळ्याच गोष्टीवर एकंदरीत परिणाम झाला. ते सगळं अंगाशी आलं होतं. पुण्यात घेतलेलं सुंदर असं एक रो-हाऊस होतं. ते घर माझ्या बायकोनं ते घर स्वत: च्या हातानं शेणानं सारवलं होतं. त्या घरात असलेल्या सगळ्या भांडी या पितळाच्या होत्या. सगळ्या गोष्टी तिनं शोधून आणून ते घर सजवलं होतं. त्या घरात एकही स्टिलची वस्तू नव्हती. तिथला फ्रिज सुद्धा हा मातीचा होताय. त्या घराच्या समोर बैलगाडी बनवली होती, मागे खोटी विहीर, मोट होती. त्या घरात आम्ही येऊ-जाऊन अशी दोन वर्ष राहिलो. पण ‘कच्चा लिंबू’ हा चित्रपट करत असताना त्या दोन वर्षात काम न केल्यानं मला काही नाही म्हणून ते घर विकावं लागलं. ते घर विकून मी माझ्या बायकोचा आनंद घालवून टाकला. तो अधिकार मला नव्हताच. ती कलाकृती सुंदर व्हावी यासाठी मी दुसरं काही काम न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात माझ्या बायकोनं माझी साथ दिली होती. पण शेवटी काही ऑप्शन नाही म्हणून मला तिच्या स्वप्नांवर पाणी सोडावं लागलं आणि ते घर विकावं लागलं."