मुंबई : 'हे डार्लिंग्स.....', असं म्हणत 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रेक्षकांचं लक्ष वेधत आहे. तो असं नेमकं का करतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, प्रभास सध्या व्यग्र आहे ते म्हणजे त्याच्या 'साहो' या आगामी चित्रपटाच्या तयारीत. 'साहो' प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून प्रभास व्यग्र असतानाच त्याची एक झलत पाहून 'आया मोरा सैयां सायको....' असं एकजण म्हणत आहे.
'सायको सैयां' म्हणणारा हा चेहरा तसा ओळखीचाच आहे. कारण तो चेहरा आहे, अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा. हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम अशा भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील पहिलं गाणं 'सायको सैया' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
श्रद्धा कपूर आणि प्रभास यांच्यावर चित्रीत या गाण्याचीच चर्चा चित्रपट वर्तुळात सुरु आहे. कारण, यामध्ये श्रद्धासोबतच खुद्द प्रभासही ठेका धरताना दिसत आहे. त्याचा हा अंदाज पाहता पुन्हा एकदा तरुणींच्या नजरा त्याच्यावरच खिळणार असं म्हणायला हरकत नाही.
तनिष्क बागचीने लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेलं हे गाणं तुम्हालाही ठेका ठरायला भाग पाडोल. साचेत टंडन, ध्वनी भानूशाली आणि तनिष्क बागची यांनी गायलेलं हे गाणं पार्टी साँग्सच्या यादीत लोकप्रिय झाल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही.
सुजित दिग्दर्शित या चित्रपटातून अभिनेता नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, अरुण विजय, संपत राज आणि अभिनेत्री मंदिरा बेदी हे कलाकारही झळकणार आहेत. जवळपास ३०० कोटींच्या निर्मिती खर्चातून साकारण्यात आलेल्या या चित्रपटातून अद्वितीय साहसी दश्य पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सोबतच प्रभास आणि 'आशिकी गर्ल' श्रद्धाची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही चित्रपटाच्या जमेची बाजू ठरणार आहे.