मुंबई : प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर 'साहो' आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं बजेट ३५० कोटींच्या घरात असल्याचं बोललं जातंय. पण चित्रपटाला प्रदर्शनाच्या काही वेळातच पायरसीचा फटका बसल्याची माहिती मिळत आहे. 'साहो' प्रदर्शित झाल्याच्या काही तासांतच ऑनलाइन लीक करण्यात आला आहे.
'साहो'साठी प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता होती. या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी अॅडव्हान्स बुकिंगही केलं होतं. मात्र अशातच टोरंट साइट तमिल रॉकर्सकडून चित्रपट ऑनलाइन लीक करण्यात आला आहे. याआधीदेखील तमिल रॉकर्सकडून अनेक चित्रपट लीक करण्यात आले आहेत.
तमिल रॉकर्स नावाची ही साइट जवळपास प्रत्येक आठवड्यात प्रदर्शित होणारे चित्रपट ऑनलाइन लीक करते. पहिल्याच प्रदर्शनानंतर तमिल रॉकर्सने 'जजमेंटल है क्या', 'पेटा', 'गली बॉय', 'ठग्स ऑफ हिंदोस्तान', 'विश्वासम' आणि '२.०' यांसारखे चित्रपट लीक केले आहेत.
पायरसी वाढवणाऱ्या आणि चित्रपट ऑनलाइन लीक करणाऱ्या या साइटवर सरकारने बंदी घातली आहे. पायरसीविरोधात 'फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया'च्या सदस्यांकडून याबाबत आंदोलनही करण्यात आले. मद्रास उच्च न्यायालयाकडूनही याबाबत दखल घेण्यात आली. मात्र तरीही तमिल रॉकर्सकडून सतत चित्रपट लीक केले जात आहेत.
फक्त हिंदीच नव्हे, तर विविध भाषांमधील इतर चित्रपटही या वेबसाईटवर लीक झाले असून, त्याचा फटका चित्रपटाला बसतो. चित्रपट लीक झाल्यामुळे कमाईच्या आकड्यांवर त्याचा परिणाम होतो. सुरुवातीला तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड असे चित्रपट या वेबसाईटवर लीक होत होते. ज्यामागोमाग हिंदी आणि इंग्रजी चित्रपटही यावर लीक होऊ लागले आणि कलाविश्वाची डोकेदुखी वाढली. वारंवार डोमेन बदलत असल्यामुळे या वेबसाईटला आळा घालणं ही महत्त्वाची समस्या झाली आहे.
'साहो' भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक बजेट असणारा चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. सुजीथ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. चित्रपटात जॅकी श्रॉफ, नील नितिन मुकेश, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर या कलाकारांनी भूमिका साकारली आहे.