नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर अभियानाची घोषणा केली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी या अभियानातील टप्पे जनतेपर्यंत पोहोचवले. दुसरीकडे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मजुरांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. यावर अर्थमंत्री सितारामण यांनी टीका केली होती. पण कामगारांच्या या मुद्द्यावरुन बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डा हिने अर्थमंत्री सितारामण यांच्यावर निशाणा साधला आहे.
लॉकडाऊनमुळे आपल्या घराकडे निघालेले कामगारांचा भुकेने, अपघाताने बळी जातोय. या कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांना दिलासा देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतली. राहुल यांनी कामगारांसोबत राहुन त्यांनी विचारपूस केली. पण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितरामण यांनी या सर्वाला ड्रामा असे संबोधले.
जेव्हा मजूर दु:खात पायी आपल्या घरी जात आहेत. त्यांचा वेळ वाया घालवला गेला. त्यापेक्षा त्यांच्यासोबत पायी चालले असते असते असा टोला निर्मला सितारामण यांनी राहुल गांधींना लगावला. ते मजुरांच्या मुलांची बॅग हातात घेऊ शकले असते असेही त्या म्हणाल्या. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर टीका करताना काँग्रेसने अधिक जबाबदारीने वागले पाहिजे, असे सीतारामन यांनी सांगितले. काँग्रेसशासित राज्यांकडून मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी जादा रेल्वेगाड्यांची मागणी करण्यात आली आहे आणि ते आम्हाला ड्रामेबाज म्हणतात. मग कालचा प्रकार काय होता? राहुल गांधी यांनी मजुरांची भेट घेणे हा निव्वळ नाटकीपणा होता, अशी टीका सीतारामन यांनी केली.
यावर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डाने ट्वीटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कृपया या मजुरांना वाहनाची व्यवस्था करा. ते सुखरुप घरी जातील. त्यांचा चालण्याचा खूप वेळ वाचेल असे रिचाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी दिल्लीच्या सुखदेव विहार उड्डाणपुलाच्या परिसरातून चालत जात असलेल्या मजुरांशी संवाद साधला. यावेळी काही मजूर विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला बसून होते. याठिकाणी आल्यानंतर राहुल गांधीही त्यांच्यासोबत फुटपाथवर बसले. यानंतर राहुल गांधी यांनी स्थलांतरित कामगारांशी संवाद साधला. या मजुरांनी आपल्या व्यथा मोकळेपणाने राहुल यांच्यासमोर मांडल्या.
या चर्चेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी कारची सोय करून दिली. हे मजूर हरियाणाच्या झाशी येथील असल्याचे सांगितले जाते. राहुल गांधी यांनी आपल्याला वाहनाची सोय करून दिली. तसे खाणे, पाणी आणि मास्कही दिला. यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया एका मजुराने व्यक्त केली.