मुंबई : अनेक वादांना सामोर गेल्यानंतर 'परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. उल्लेखनीय म्हणजे, 20 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतानं पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी घेतली... आणि सगळ्या जगालाच आश्चर्याचा धक्का दिला होता... आणि हाच मुहूर्त साधत 'परमाणू'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 'हिरो वर्दी से नही, इरादे से बनते है' हा डायलॉग प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहतोय. या सिनेमात मुख्य भूमिकेत जॉन अब्राहम, बोमन इराणी आणि डायना पेन्टी दिसत आहेत.
सिनेमात सहा भारतीय धडाकेबाज अधिकाऱ्यांची कथा चितारली गेलीय ज्यांनी अनेक संघर्षानंतरही हे परिक्षण यशस्वी करून दाखवलं. अभिषेक शर्मा दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 25 मे रोजी प्रदर्शित होतोय.
भारताचे दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली ही अणुचाचणी यशस्वी झाली होती. १९६२ च्या चीनच्या आक्रमणानंतर भारताने लष्करीदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी आपली संरक्षणसिद्धता जगाला दर्शविण्यासाठी १९७४ व १९९८ मध्ये पोखरण येथे अणुचाचण्या केल्या होत्या. ११ मे १९९८ रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी राजस्थानातील पोखरण येथे एकाच वेळी तीन अणुस्फोट घडवून आणलेत व १३ मे १९९८ रोजी पुन्हा दोन अणुस्फोट घडवून आणलेत. हे ऑपरेशन 'ऑपरेशन शक्ती' म्हणून ओळखलं जातं.